
एका दहशतवाद्याला पकडून देण्यास मदत केल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे गोडवे गायले होते. यामुळं पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हुरळून गेले होते. हीच बाब अख्ख्या जगाला ओरडून सांगणाऱ्या शरीफ यांना डोनाल्ड ट्रम्प लवकरच मोठा झटका देणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली जाऊ शकते. पुढील आठवड्यापासूनच ही बंदी लादली जाण्याची शक्यता आहे. संबंधित आदेशावर ट्रम्प स्वाक्षरी करू शकतात.
ट्रम्प प्रशासनाकडून अनेक देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करू शकतात. तशी तयारी त्यांनी केली आहे. देशाची सुरक्षितता हे कारण त्यांनी पुढे केले आहे, असे सांगण्यात येत आहे. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांव्यतिरिक्त इतर देशांच्या नागरिकांनाही अमेरिकेत प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगितले जात आहे. ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातही सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांना प्रवेशबंदी केली होती.
२०१८ मध्ये ट्रम्प यांचे हे धोरण अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने कायम ठेवले होते. मात्र, माजी अध्यक्ष जो बायडेन यांनी २०२१ मध्ये ही बंदी उठवली होती.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १२ मार्चपर्यंत त्या देशांची यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. याआधी ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या इतर देशांतील नागरिकांना त्यांच्या मायदेशात पाठवण्याबाबत कठोर पाऊल उचलले होते. ट्रम्प यांच्या या धोरणाची जगभर चर्चा झाली होती. ऑक्टोबर २०२३ मध्येच निवडणूक प्रचारात त्यांनी गाझा पट्टी, लिबिया, सोमालिया, सिरिया आणि यमनसारख्या देशांतील नागरिक हे सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे संबोधले होते.
आता डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करू शकतात. ट्रम्पच्या या धोरणाचा अफगाणिस्तानमधील हजारो नागरिकांना फटका बसू शकतो. याच नागरिकांना शरणार्थी म्हणून किंवा विशेष प्रवासी व्हिसावर अमेरिकेत वास्तव्य करण्यास मंजुरी मिळाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.