
उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये पुन्हा एकदा हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. रुद्रप्रयागच्या गौरीकुंड आणि सोनप्रयाग परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे होते. हे हेलिकॉप्टर केदारनाथवरून यात्रेकरूंना घेऊन परत जात असताना ही घटना घडली. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके घटनास्थळी दाखल झाले आहे. हेलिकॉप्टरचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले आहेत. या सातही जणांचे मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या हेलिकॉप्टरच्या अपघातानंतरचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
रविवारी पहाटे साडेपाच वाजता हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीला निघाले होते. त्याचदरम्यान खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर घनदाट जंगलात कोसळलं. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, गौरीकुंडच्या वर गवत कापणाऱ्या नेपाळी महिलांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. हेलिकॉप्टर गौरी माई खार्कच्या वरच्या जंगलात कोसळले. एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. उत्तराखंडचे सीएम धामी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हेलिकॉप्टर अपघातावर दुःख व्यक्त केले आहे.
तांत्रिक बिघाड आणि खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे कारण सांगितले जात आहे. २ मे रोजी केदारनाथचे दरवाजे उघडल्यानंतर हेलिकॉप्टर अपघाताची ही पाचवी घटना आहे. आजच्या हेलिकॉप्टर अपघाताबाबत असे सांगितले जात आहे की, पहाटे ५:१७ वाजता आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशी हेलिपॅडकडे सहा भाविकांना घेऊन उड्डाण करत होते. वाटेत खराब हवामानामुळे दुसऱ्या ठिकाणी हार्ड लँडिंग केल्यानंतर हेलिकॉप्टर खराब झाले त्यानंतर ते कोसळले.
जिल्हा पर्यटन विकास अधिकारी आणि नोडल हेली सर्व्हिस राहुल चौबे यांनी सांगितले की, आज सकाळी एक हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच त्याची चौकशी आणि शोध घेण्यात आला. आर्यन एव्हिएशनचे एक हेलिकॉप्टर श्री केदारनाथ धाम येथून प्रवाशांना त्यांच्या गुप्तकाशी तळावर परत आणत होते. तेव्हा पायलटने दरीतून हेलिकॉप्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण ते कोसळले. पायलटव्यतिरिक्त हेलिकॉप्टरमध्ये ५ भाविक आणि एक लहान मुल होते. एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस दलासह सर्व बचाव पथके स्थानिक लोकांच्या मदतीने शोध आणि बचाव कार्य करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.