
जपानमध्ये फ्लू रूग्णांच्या संख्येत वाढ.
सरकारनं महामारी घोषित केली.
१३५ शाळा अन् डे - केअर्स सेंटर बंद.
जपानमध्ये फ्लूच्या रुग्ण संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे. सरकारने देशभर 'फ्लू महामारी' ची अधिकृत घोषणा केली आहे. कागोशिमा, ओकिनावा आणि टोकियोसारख्या शहरांमध्ये फ्लूचा मोठा प्रकोप आहे. रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी झाली असून, अनेक ठिकाणी बेडची कमतरता आहे. संसर्ग रोखण्यासाठी १३५ हून अधिक शाळा आणि डे-केअर सेंटर्स तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. कोरोनानंतर फ्लू डोकं वर काढतोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोग्य तज्ज्ञांनुसार, यावर्षीचा फ्लू सामान्यपेक्षा अधिक गंभीर आणि धोकादायक ठरत आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचे आणि फ्लूची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कंपन्या आणि शाळांना लवचिक कामकाज आणि ऑनलाइन पर्याय वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रवासादरम्यान मास्क वापरण्याचे आणि स्वच्छतेचे नियम पाळण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.
फ्लू संसर्ग वेगाने पसरतोय
जपानच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबरपर्यंत फ्लूमुळे सुमारे ४,००० हून अधिक रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. जी संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत चार पटीने जास्त आहे. संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून १३५ हून अधिक शाळा आणि डे-केअर सेंटर्स तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. शासकीय आकडेवारीनुसार, देशातील प्रत्येक क्लिनिकमध्ये फ्लूच्या रुग्णांची संख्या सामान्यपेक्षा खूप वाढल्यामुळे परिस्थिती महामारीसारखी झाली आहे. यामागाटा प्रांतातील एका शाळेत ३६ पैकी २२ मुलांना फ्लूची लक्षणे आढळल्याने शाळा बंद करावी लागली.
फ्लूचा सर्वाधिक परिणाम या शहरांवर:
जपानमधील कागोशिमा, ओकिनावा, टोकियो आणि इतर प्रभावित भागांमध्ये फ्लूच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स (खाटा) अपुरे पडत असून, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना प्रचंड थकवा आला आहे. अनेक रुग्णालयांचे वेटिंग रूम्सही भरले आहेत. त्यामुळे गरज नसल्यास रुग्णालयात येऊ नका आणि फ्लूची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने लोकांना केले आहे.
लॉकडाउन नाही, पण खबरदारी आवश्यक
जपान सरकारने कठोर लॉकडाऊन किंवा निर्बंध लागू केले नाहीत. मात्र, अधिकाऱ्यांनी कंपन्या आणि शाळांना लवचिक (Flexible) कामकाज आणि ऑनलाईन पर्याय स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. सरकारने लोकांना लस (Vaccine) घेण्याचे आवाहन केले आहे.
यासोबतच, लहान मुले, वृद्ध आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना इतरांपासून सुरक्षित अंतर राखण्यास आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. तज्ज्ञांनी प्रवासादरम्यान मास्क घालणे, हात धुणे आणि स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.