इंडिया आघाडीची 6 डिसेंबर रोजी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. या बैठकीला काही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहू शकत नसल्याने ही बैठक तूर्तास पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीत समाविष्ट पक्षांच्या खासदारांची बैठक ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. त्यानंतर डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी या आघाडीच्या प्रमुख नेत्यांची औपचारिक समन्वय बैठक होणार आहे.
नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोरामच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले, अशावेळी ही बैठक होणार होती. त्यामुळेच अनेक नेत्यांना या बैठकीला जाणं टाळलं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच इंडियाच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं कळवलं होतं. यानंतर चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक नेते एमके स्टॅलिन बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिलं आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एका कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त आहेत. (Latest Marathi News)
देशातील पाचपैकी चार राज्यांमध्ये काँग्रेसचा दारूण पराभवामुळे इंडिया आघाडीची बैठक रद्द झाल्यानंतर विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. तेलंगणात काँग्रेसने निश्चितच मोठा विजय नोंदवला आहे. मात्र मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मिझोराममध्येही 2018 च्या तुलनेत काँग्रेसची कामगिरी खराब राहिली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने प्रादेशिक पक्षांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. या पराभवातून काँग्रेसने आत्मचिंतन केलं पाहिजे आणि पुढील रणनिती आखली पाहिजे, असं अनेक नेते म्हणत आहेत.
इंडिया आघाडीच्या आतापर्यंत पाटणा, बंगळुरू आणि मुंबई येथे तीन बैठका झाल्या आहेत. आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत युतीच्या भविष्यातील कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यासाठी 14 सदस्यीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. त्यामुळे आता बदलेल्या राजकीय परिस्थितीनुसार इंडिया आघाडीचं भवितव्य कसं असेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.