

केंद्र सरकारने प्रशासकीय स्तरावर मोठा फेरबदल केला आहे. विविध मंत्रालयांचे सचिव आणि सुमारे २४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट नियुक्ती समितीने मंगळवारी या सर्व बदल्या आणि नियुक्त्यांच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिली. या फेरबदलामुळे आगामी काळात विविध महत्त्वाच्या मंत्रालयांच्या कामकाजात प्रशासकीय गती मिळण्याची शक्यता आहे. अधिकृत आदेशानुसार, वरिष्ठ सनदी अधिकारी वीर विक्रम यादव यांची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वीर विक्रम यादव यांनी फैज अहमद किदवई यांची जागा घेतली आहे. बिहार कॅडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी चंचल कुमार यांची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासह निवेदिता शुक्ला वर्मा यांची प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या सचिवपदी वर्णी लागली आहे.
निवेदिता शुक्ला वर्मा यांच्याकडे पेन्शन विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. वर्मा यांच्याकडे प्रशासकीय सुधारणा विभागाचीही जबाबदारी आहे. त्या याआधी पेट्रो-केमिकल विभागात सचिव होत्या. पंजाब कॅडरचे तेजवीर सिंह यांची रसायन आणि पेट्रो-केमिकल विभागाचे सचिवपदी नियुक्ती झाली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयातील संजय जाजू यांची ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे.
यासह कर्नाटक कॅडरचे श्रीवत्स यांच्याकडे अल्पसंख्याक मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच उत्तर प्रदेश कॅडरचे नरेंद्र भूषण हे ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत भू-संसाधन विभागाचे सचिव असणार आहेत. अल्पसंख्याक मंत्रालयाचे सचिव चंद्रशेखर कुमार यांची कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत 'राष्ट्रीय पर्जन्यक्षेत्र प्राधिकरण'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.