Gujarat Rain News: गुजरातमध्ये पावसाचा कहर! आत्तापर्यंत २८ जणांचा मृत्यू, १७८०० जणांची सुटका; प्रशासन अलर्ट
गुजरात, ता. २९ ऑगस्ट २०२४
गेल्या चार दिवसांपासून गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यातील २४ नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून अनेक भागात पाणी शिरले आहे. पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे अनेक भागात पाणी शिरले असून आत्तापर्यंत विविध दुर्घटनांमध्ये २८ जणांचा मृत्यू झाला आहे तर १७८०० जणांचे रेस्क्यू करण्यात आले आहे. या पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारसह बचाव पथके अलर्ट झाली आहेत.
गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार!
गुजरातमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. यामध्ये आत्तापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 13 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू, घर कोसळून 13 जणांचा तर झाडे कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. राज्यामध्ये सलग चौथ्या दिवशी राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून पूरग्रस्त भागातून 17,800 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
मोठ्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू
वडोदरा येथे पाऊस थांबला असूनही, शहरातून वाहणाऱ्या विश्वामित्री नदीचे पाणी रहिवासी भागात शिरले आहे. त्यामुळे सखल भागात आणि इमारती, रस्त्यांवर पाणी साचले असून गाडयाही पाण्याखाली गेल्या आहेत. दुसरीकडे रविवारी मोरबी जिल्ह्यातील हलवद तालुक्यातील धवना गावाजवळ पूल ओलांडताना ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये वाहून गेल्याने बेपत्ता झालेल्या सात जणांचा मृत्यू झाला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
PM मोदींनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा
गुजरातच्या अनेक भागात पूरसदृश परिस्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आणि या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्राकडून राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. बुधवारी, सौराष्ट्र विभागातील देवभूमी द्वारका, जामनगर, राजकोट आणि पोरबंदर या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी 6 ते 12 तासांच्या कालावधीत 50 मिमी ते 200 मिमी पाऊस झाला. देवभूमी द्वारका जिल्ह्यातील भानवड तालुक्यात या कालावधीत 185 मिमी पाऊस झाला, जो राज्यातील सर्वाधिक आहे.
आजही पावसाची शक्यता
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. वडोदरा शहरातील घरांमध्ये आणि छतावर अडकलेल्या लोकांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि लष्कराच्या तीन तुकड्यांद्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच मंत्री हृषिकेश पटेल यांनी वडोदरामधून आतापर्यंत ५,००० हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे आणि १२०० इतरांना वाचवण्यात आले आहे. बुधवारी लष्कराच्या तीन अतिरिक्त तुकड्या आणि एनडीआरएफ आणि एसडीआरएफची प्रत्येकी एक तुकडी शहरात तैनात करण्यात आली होती.
बचावकार्य सुरू
NDRF आणि SDRF व्यतिरिक्त, लष्कर, भारतीय वायुसेना आणि तटरक्षक दल पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या भागात बचाव आणि मदत कार्य करत आहेत, ज्यामध्ये आतापर्यंत सुमारे 17,800 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे आणि 2,000 लोकांना वाचवण्यात आले आहे, अधिकारी म्हणाला. गेल्या चार दिवसांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू राजकोट, आनंद, महिसागर, खेडा, अहमदाबाद, मोरबी, जुनागढ आणि भरूच जिल्ह्यात झाले आहेत. मंगळवारी राज्याच्या विविध भागात भिंत कोसळणे आणि बुडणे यासारख्या पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान नऊ जणांचा मृत्यू झाला, असे अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.