भारताचा विकास झपाट्याने होत असून लोकांचं जीवनमानही उंचावत आहे. साहजिकच त्याचा पर्यटनावर सकारात्मक परिणाम होत आहे. नुकताच मेक माय ट्रीपने (MakeMyTrip) एक अहवाल प्रसिद्ध केला, या अहवालात भारतीयांचा विदेशातील प्रवास मोठ्या प्रमाणात वाढल्याचं म्हटलं आहे. कझाकस्तान आणि अझरबैजानमध्ये प्रवास करण्यात भारतीय पसंती वाढल्याचंही समोर आलं आहे.
भारतीयांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासात लक्षणीय वाढ झाली आहे. मे 2024 पर्यंतच्या 12 महिन्यांत दोन किंवा अधिक आंतरराष्ट्रीय ट्रिप करणाऱ्यांची संख्या 32 टक्क्यांनी वाढली आहे, तर तीन किंवा अधिक ट्रिप करणाऱ्यांची संख्या 37 टक्क्यांनी वाढली आहे. या अहवालातून भारतीय नागरिक आंतरराष्ट्रीय प्रवासाला अधिक पसंती देत असून परदेश वारीची ठिकाणंही बदलत असल्याचं म्हटलं आहे.
युनायटेड अरब अमीरात (UAE), थायलंड, युनायटेड स्टेट्स (US), सिंगापूर आणि इंडोनेशिया हे देश अजूनही भारतीय प्रवाशांसाठी मुख्य प्रवासाची ठिकाणे आहेत. त्याचप्रमाणे नवीन देशही भारतीय प्रवाशांमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहेत. कझाकस्तान आणि अझरबैजानला सर्च व्हॉल्यूममध्ये अनुक्रमे 491 टक्के आणि 404 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय भूतान, हाँगकाँग, आणि श्रीलंका या देशांचं सर्च व्हॉल्यूमही दुप्पट झालं आहे.
नवीन देशांच्या सर्च व्हॉल्यूममध्ये 70 टक्के वाढ झाली आहे. विशेषतः अलमाती (कझाकस्तान) आणि बाकू (अझरबैजान) याठिकाणी सर्च व्हॉल्यूममध्ये अनुक्रमे 527 टक्के आणि 395 टक्के वाढ झाली आहे. भारतीय प्रवाशांच्या बदलत्या प्रवासाच्या आवडीनुसार नवीन देशांचा प्रवास 10 टक्क्यांवरून 14 टक्क्यांवर गेला आहे. कझाकस्तान आणि अझरबैजानसह मध्य आशियाई देशांना भारतीय प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. यासाठी भारताशी थेट उड्डाणांची सुविधा आणि सोप्या व्हिसा यंत्रणा यांचा मोठा वाटा आहे. काही देशांमध्ये भारतीय नागरिकांना व्हिसा फ्री करण्यात आला आहे. कझाकस्तान, भूतान आणि श्रीलंका, तर इतर ठिकाणी तातडीच्या इलेक्ट्रॉनिक व्हिसाप्रणाली उपलब्ध झाल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.