
सीएनजी गळतीमुळे चालत्या टॅक्सीला भीषण आग लागली.
लागलेल्या आगीमध्ये टॅक्सीचालकाचा टॅक्सीतच जळून मृत्यू झाला.
ही दुर्घटना ग्रेटर फरिदाबादच्या सेक्टर-८४ परिसरात घडली.
Fire : सीएनजी गळतीमुळे एका टॅक्सीला भीषण आग लागली. आग इतक्या वेगाने पसरली की, टॅक्सीत बसलेला चालक हा टॅक्सीतून बाहेर पडू शकला नाही. दुर्दैवाने टॅक्सीमध्ये तो जिवंत जळाला. ही धक्कादायक घटना ग्रेटर फरिदाबादमधील सेक्टर-८४ पुरी प्रथम चौक येथे घडली आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव अजय असे आहे. ते जुन्या भूपाणी कॉलनीतील रहिवासी आहेत. ते अॅप-आधारित टॅक्सी चालवतात. अपघाताच्या वेळी ते प्रवाशांची वाट पाहत ग्रेटर फरिदाबादमध्ये टॅक्सी चालवत होते. सेक्टर-८४ पुरी प्रथम सोसायटीजवळून जाताना टॅक्सी अचानक पंक्चर झाली. पंक्चरमुळे टॅक्सी डिव्हायडरला थोड्या वेळासाठी धडकली आणि पुढे चालू राहिली. यादरम्यान टॅक्सीतून सीएनजी गळती होऊ लागली.
सीएनजी गळती सुरु झाल्याचे समजताच अजय यांनी टॅक्सी थांबवली. टॅक्सीबाहेर पडण्याआधीच अचानक आगीचा भडका उडाला. आग वेगाने पसरत गेली, यातच अजय यांचा अंत झाला. सीएनजी गळती झाली तेव्हा, त्यांनी टॅक्सी बंद केली असावी, त्यानंतर ती सुरु केल्यावर आग पसरली. दरवाजे बंद असल्याने ते बाहेर पडू शकले नसतील, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
टॅक्सीला आग लागली तेव्हा त्याभोवती मोठी गर्दी झाली होती. लोकांनी आग विझवण्याचा आणि चालक, अजय यांना टॅक्सीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण आगीची तीव्रता इतकी होती, की त्यांना बाहेर काढणे कोणाला शक्य झाले नाही. अग्निशमन दल येण्यापूर्वीच चालकाचा मृत्यू झाला. अग्निशमन दल आणि पोलिसांनी आग विझवली आणि मृतदेह बाहेर काढला.
या घटनेची माहिती मिळताच अजय यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला. सीएनजी गळतीमुळे लागलेल्या आगीमुळे अजय यांचा मृत्यू झाल्याची माहिती बीपीटीपी पोलिस स्टेशनचे एसएचओ अरविंद कुमार यांनी दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवाल मिळाल्यानंतर पुढील तपासाला वेग मिळेल असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.