

हरभजन सिंग यांनी शेअर केलेल्या झोम्बी ड्रग्ज व्हिडिओचा फॅक्ट चेक
हरभजन सिंग यांचा व्हायरल व्हिडिओ पंजाबचा नसून राजस्थानचा
पंजाब पोलिसांनी व्हायरल व्हिडिओमागचं सत्य सांगितलं
झोम्बी ड्रग्जचा व्हायरल व्हिडिओ श्रीगंगानगरमधील असल्याचे उघड
राज्यसभा खासदार आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यावरून त्यांच्यावर सध्या जोरदार टीका केली जात आहे. त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ पंजाबमधील अमली पदार्थांच्या समस्येसंदर्भातील होता. त्यांनी तो व्हिडीओ पंजाबमधील असल्याचा दावा त्यांनी केला होता. तसंच पंजाबमधील अमली पदार्थांच्या सेवनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. पण आता त्यांनी शेअर केलेला तो व्हिडीओ पंजाबचा नसल्याची माहिती समोर आली आहे. पंजाब पोलिसांनीच फॅक्ट चेक करत हरभजन सिंग यांना उत्तर दिलं आहे.
पंजाब पोलिसांनी फॅक्ट चेक करत स्पष्ट केले की, व्हायरल झालेला व्हिडिओ पंजाबमधील नसून राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील आहे. हरभजन सिंग यांनी शेअर केलेला झोंबी ड्रग्जचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यावर नेटकऱ्यांसह अनेक राजकीय नेत्यांनी कमेंट्स केल्या होत्या. हरभजन सिंग यांनी हा व्हिडीओ शेअर करत झोंबी ड्रग्ज हा शब्द वापरला होता. ज्यामध्ये पंजाबी स्टाइलमध्ये फेटा घातलेले दोन तरुण रस्त्यावर ड्रग्जच्या नशेत उभे राहिल्याचे दिसत होते. हरभजन सिंग यांनी अंमली पदार्थाचे वर्ण करताना झोंबी ड्रग्ज हा शब्द वापरला होता. पण त्या तरुणांनी खरंच ड्रग्ज घेतले होते की नाही याची काहीच माहिती समोर आली नाही.
हरभजन सिंग यांनी सोमवारी रात्री सोशल मीडियावर दोन तरुणांचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ते दोघे रस्त्यावर अमली पदार्थाच्या नशेत विचित्र पद्धतीने उभे असलेले दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना, हरभजन सिंग यांनी पंजाबमधील तरुणांमधील अमली पदार्थांच्या व्यसनाच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि पंजाब आणि तेथील तरुणांना चांगल्या सोयी मिळाल्या पाहिजे अशी मागणी केली होती. त्यांनी सरकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात प्रामाणिकपणा, उत्तरदायित्व आणि तात्काळ कारवाईची गरज असल्याचे म्हटले. हरभजन सिंग यांनी पंजाबच्या तरुणांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून वाचवले पाहिजे असेही आवाहन केले.
हरभजन सिंग यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ समोर आल्यानंतर पंजाब पोलिसांनी त्यांच्या अधिकृत 'एक्स' अकाऊंटवरून हरभजन सिंग यांना टॅग करून स्पष्ट केले की, हा व्हिडिओ पंजाबमधील नसून राजस्थानमधील श्री गंगानगर येथील आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडिया युजर्सला कोणताही व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी त्याचे ठिकाण आणि फॅक्ट चेक पाहण्याचे आवाहन केले आहे.
या व्हिडीओवरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरभजन सिंग यांच्यावर निशाणा साधला. अशी पोस्ट शेअर करण्याचे निर्देश वरिष्ठांकडून आले होते का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंजाबच्या कॅबिनेट मंत्री बलजीत कौर यांनीही हरभजन सिंग यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, 'राजस्थानचा व्हिडिओ पंजाबचा असल्याचे भासवून राज्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.' तर आणखी एका मंत्र्याने आरोप केला की, 'भाजप पंजाबला बदनाम करण्यासाठी चुकीच्या माहितीचा वापर करत आहे.'
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरचा हा पहिलाच असा वाद आहे. हरभजन सिंग यांनी एप्रिल २०१६ मध्ये आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून पंजाबशी संबंधित मुद्द्यांवरील त्यांचा सोशल मीडियावरील सक्रिय सहभाग हा राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. हरभजन यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत पंजाबच्या राजकारणात गदारोळ निर्माण झाला आहे. त्यांच्यावर सध्या टिकेची झोड सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.