दिल्ली विमानतळावर विमानातून धूर निघाल्याची घटना
तात्काळ आपत्कालीन स्थिती जाहीर
प्रवाशांची सुरक्षित सुटका, ४ जखमी
लँडिंग गिअर बिघाडाची शक्यता
तपास सुरू, मोठी दुर्घटना टळली
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहाटे मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. स्वित्झर्लंडमधील झ्युरिचकडे जाणाऱ्या SWISS International Air Lines च्या विमानातून अचानक धूर निघाल्याने हा प्रकार घडला. या घटनेमुळे विमानतळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान उड्डाणासाठी पूर्णपणे सज्ज होते. या विमानात एकूण २२८ प्रवासी आणि चार लहान मुले होती. मात्र, टेकऑफपूर्वीच विमानाच्या लँडिंग गिअरमधून अचानक धूर येऊ लागल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आपत्कालीन प्रक्रिया सुरू करण्यात आली. विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी क्रू मेंबर्स आणि विमानतळ कर्मचाऱ्यांनी जलदगतीने हालचाली केल्या.
या दरम्यान प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घाईगडबडीत विमानातून बाहेर पडताना किमान चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास विमानतळावर पूर्ण आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली.
तत्काळ अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुरक्षा यंत्रणांनी परिस्थिती नियंत्रणात आणत विमानाभोवती खबरदारीची पावले उचलली. लँडिंग गिअरमधून धूर का निघाला, यामागे तांत्रिक बिघाड आहे का, याचा सखोल तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी अशा घटनांमुळे सुरक्षा उपाययोजनांबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.