CWC Meeting Update News | नवी दिल्ली: काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक रविवारी, २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता व्हर्च्युअल होईल, अशी माहिती पक्षाचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी दिली जाईल, असेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अध्यक्ष होण्यास नकार कळवला आहे. गांधी घराण्याबाहेरील नेत्याने पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे, असे राहुल गांधी यांना वाटते. सोनिया गांधींना आरोग्यविषयक समस्यांमुळे अध्यक्षपद नकोय. तर राहुल गांधी यांनीच पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, असे काही नेत्यांना वाटते.
राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे अध्यक्षपद घेण्यास तयार नसतील तर, प्रियांका गांधींना अध्यक्ष करावे, याचा विचार काँग्रेसचे काही नेते करत आहेत. प्रियांका गांधींकडे अध्यक्षपद देण्यास राहुल गांधीचीही तयारी असल्याचे सांगण्यात येत आहे. माझ्या नेतृत्वाखाली पक्षाचा लोकसभेच्या दोन्ही निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे, असं राहुल यांचे म्हणणे आहे.
अध्यक्षपदासाठी गहलोत यांचं नाव आघाडीवर
सोनिया गांधी यांनी अशोक गहलोत यांच्याकडे पक्षाचे (Congress) अध्यक्षपद देण्यास सांगितल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत गहलोत यांच्याकडे माध्यमांनी विचारणा केली असता, मीडियाच्या माध्यमातूनच हे ऐकत आहे. याबाबत मला काहीच माहिती नाही. मला जी जबाबदारी दिली आहे, ती मी पार पाडत आहे, असे ते म्हणाले.
राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारत नसल्याने देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते निराश होतील. त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आणि अध्यक्षपद स्वीकारले पाहिजे, असे यापूर्वी गहलोत म्हणाले होते.
दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा होणार आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेसला कायमस्वरुपी अध्यक्ष मिळणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधींकडे अंतरिम अध्यक्षपद देण्यात आले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.