
BJP releases first candidates list for Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आखाडा तारखा जाहीर होण्याआधीच तापला असून, भाजपनं पहिला डाव टाकला आहे. २९ मतदारसंघांतील पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यापूर्वी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने यादी जाहीर केली होती.
भाजपनं पहिली यादी जाहीर केल्यानंतर अनेक मतदारसंघांतील प्रमुख लढतींचं चित्र स्पष्ट झालंय. आपचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात मैदानात कोण उभं ठाकलंय हे स्पष्ट झालं आहे. आता या आखाड्यात कोण कुणाला चीत करणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल; पण त्याआधी या तीन हायप्रोफाइल लढती अत्यंत रोमहर्षक होतील यात शंका नाही.
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लढणार आहेत. त्यांची प्रमुख लढत दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांशी होणार आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप यांना उमेदवारी दिलीय. तर भाजपने प्रवेश वर्मा यांना रिंगणात उतरवलंय.
प्रवेश वर्मा हे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे चिरंजीव आहेत. विद्यार्थी नेता ते खासदार अशी राजकीय कारकीर्द असलेले प्रवेश वर्मा हे खमके नेते असल्याचं बोललं जातंय. तर संदीप दीक्षित हे माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांचे पुत्र असून, सहानुभूतीच्या जोरावर केजरीवालांना ते टक्कर देऊ शकतात.
केजरीवालांनी या मतदारसंघातून शीला दीक्षित यांना पराभूत केलं आहे. मात्र, तेव्हा वेगळी परिस्थिती आणि आताची राजकीय गणितं वेगळी असल्याचं राजकीय वर्तुळातून सांगितलं जातंय. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आलेले केजरीवाल यांनी तेव्हा शीला दीक्षित यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून आव्हान निर्माण केलं होतं. मात्र, केजरीवाल यावेळी स्वतः प्रामाणिकपणाची पावती मिळावी म्हणून मैदानात उतरले आहेत.
२०२० मध्ये अरविंद केजरीवाल यांनी या मतदारसंघातून २१६९७ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध भाजपचे सुनील कुमार यादव आणि काँग्रेसचे रोमेश सबरवाल रिंगणात होते. मात्र, यावेळी भाजप आणि काँग्रेसने दिग्गज चेहऱ्यांना या मतदारसंघात उतरवलं आहे. त्यामुळं यावेळी केजरीवालांसमोर मोठं आव्हान असणार आहे.
२०२० मध्ये पटपडगंज मतदारसंघातून काठावर विजय मिळालेले मनीष सिसोदिया यांना यावेळी पक्षाने जंगपुरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सुरुवातीला हा सुरक्षित मतदारसंघ असल्याचं मानलं जात होतं. पण काँग्रेस आणि भाजपकडून तगडे उमेदवार मैदानात उतरवल्यानं सिसोदियांसमोर आव्हान निर्माण झालंय. काँग्रेसने फरहाद सुरी यांना उमेदवारी देऊन आधीच सिसोदियांना आव्हान दिलं होतं. आता भाजपनं माजी आमदार सरदार तरविंदर सिंह मारवाह यांना तिकीट देत सिसोदियांचा मार्ग खडतर केला आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनाही कालकाजी मतदारसंघात घेरण्याचा पुरेपुर प्रयत्न भाजप आणि काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने त्यांच्याविरुद्ध अलका लांबा यांना उतरवलंय. तर भाजपने माजी खासदार रमेश बिधुडी यांना उमेदवारी दिली आहे. रमेश बिधुडी हे दक्षिण दिल्लीतील दिग्गज नेते आहेत. 'सर्वसामान्यांचा माणूस' म्हणून त्यांची ओळख आहे. मागील निवडणुकीत अवघ्या ११ हजार मतांनी कालकाजी मतदारसंघातून विजयी झालेल्या आतिशींना यावेळी दोन दिग्गज नेत्यांशी दोन हात करावे लागतील.
एकीकडं दिल्लीतील जवळपास तीन दशकांचा दुष्काळ संपवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. तर काँग्रेस देखील आपला गड पुन्हा मिळवण्याचा जोरदार प्रयत्न करणार आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये शून्यावर गोठलेल्या काँग्रेसने दिलेले उमेदवार बघता यावेळी संपूर्ण ताकद पणाला लावल्याचे दिसून येते. भाजप आणि काँग्रेसने आपच्या सर्वात 'शक्तीशाली' नेत्यांनाच आपल्याच बालेकिल्ल्यात घेरण्याचा प्रयत्न केला आहे. केजरीवाल, सिसोदिया, आतिशी यांना आपल्याच मतदारसंघावर अधिकाधिक लक्ष केंद्रीत करण्यास भाग पाडण्याचा दोन्ही पक्षांचा प्लान आहे. सलग १० वर्षे सत्तेत असलेल्या आपसाठी ही निवडणूक जड जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.