BJP: भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाचा अपघाती मृत्यू, माजी मुख्यमंत्र्यांच्या रोड शोदरम्यान भयंकर घडलं

Akhilesh Yadav Road Show: उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या रोड शोदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये भाजप नेत्याच्या मुलाचा मृत्यू झाला.
BJP: भाजपच्या बड्या नेताचा अपघाती मृत्यू, माजी मुख्यमंत्र्यांच्या रोड शोदरम्यान भयंकर घडलं
Akhilesh YadavSaam Tv
Published On: 

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या रोड शोदरम्यान भीषण अपघात झाला. बुधवारी गोरखपूर येथील या रोड शो दरम्यान अखिलेश यांच्या स्वागतासाठी आलेल्या जेसीबीची धडक बसल्याने भाजप नेत्याच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गोरखपूरमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर भाजप नेत्याच्या कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. नागरिकांनी रस्ता अडवला आणि अखिलेश यादव यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. पीडित कुटुंबीयांनी रोड शोच्या आयोजकांवर तसेच अखिलेश यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशमध्ये सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. बुधवारी गोरखपूरमध्ये अखिलेश यादव यांचा दौरा होता. या दौऱ्यादरम्यान रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. या रोड शो दरम्यान एक मोठा अपघात झाला. अखिलेश यादव यांच्या स्वागतासाठी आलेल्या जेसीबीची धडक बसून भाजप नेते ओंकार सिंह यांचा १४ वर्षीय मुलगा आर्यवर्धन सिंह याचा मृत्यू झाला. विमानतळापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कुधाघाटमधील महादेव झारखंडी गेटजवळ हा अपघात झाला. या घटनेची बातमी पसरताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले.

अखिलेश यादव रोड शो दरम्यान गोरखपूर विमानतळावरून पीडीए रथाने देवकाही गावाकडे जात होते. कुधाघाट येथील समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी जेसीबी तैनात करून त्यांच्यावर फुले आणि हारांचा वर्षाव केला. यावेळी भाजप नेता ओंकार सिंग यांचा १४ वर्षांचा मुलगा आर्यावर्धन स्कूटरवरून रस्ता ओलांडत असताना जेसीबीने त्याला धडक दिली आणि तो रस्त्यावर पडला. हा अपघात इतका भीषण होता की, भाजप नेत्याच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. आर्यावर्धन दहावीत शिकत होता.

अखिलेश यांच्या सभेत वापरलेल्या जेसीबीने धडक दिल्याने भाजप नेत्याच्या मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण होते. घटनास्थळी मोठा जमाव जमला. स्थानिक भाजप नेत्यांनी घटनास्थळी आंदोलन केले. परिस्थिती पाहून वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांची समजूत काढली आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नागरिकांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी यांनी या घटनेची दखल घेतली असून पीडित कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.