गेल्या २७ वर्षांपासून काँग्रेसमध्ये विविध पदांवर असलेले दिग्गज नेते मानस सिन्हा यांनी पक्षाला रामराम करत, भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसला हा मोठा झटका असल्याचे मानले जाते. काँग्रेसमधून उमेदवारी न मिळाल्याने सिन्हा नाराज होते.
मानस सिन्हा यांनी राजीनामा दिला असून, सोमवारी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. झारखंड भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र रे आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या उपस्थितीत राज्याच्या मुख्यालयात सिन्हा यांना पक्षप्रवेश झाला.
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मानस सिन्हा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. मी काँग्रेस पक्षाकरिता गेल्या २७ वर्षांपासून खूप मेहनत घेतली. मात्र, काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांना कोणताही सन्मान दिला जात नाही अशी खात्री मला झाली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मी कोणत्याही अटीविना भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे मानस सिन्हा यांनी स्पष्ट केले.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही काँग्रेसला चिमटा काढला. मी सुद्धा २२ वर्षे काँग्रेसमध्ये होतो. काँग्रेसमध्ये काय स्थिती आहे हे ठाऊक आहे. आता आम्ही राज्यात पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी एकत्रित काम करूया, असं हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितलं.
मानस सिन्हा यांनी राजीनामा देताना 'लेटरबॉम्ब' टाकला. मी माझ्या आयुष्यातील २७ वर्षे काँग्रेसला दिली. पक्षाने जे काम दिलं ते मी प्रामाणिकपणे केले. पण मी केलेल्या कामाला अजिबात महत्व दिलेले दिसले नाही. चौथ्यांदा पक्षाकडून माझा अपमान झाला. माझी सहनशक्ती आता कमी झाली. आतापर्यंत मी पक्षाचा विचार करत होतो. पण आता नाही. पक्षाच्या सर्व पदांचा मी राजीनामा देत आहे, असे सिन्हा यांनी सांगितले.
मानस सिन्हा यांना गढवा जिल्ह्यातील भवनाथपूर मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. पण इंडिया आघाडीत झारखंड मुक्ती मोर्चाच्या वाट्याला ही जागा गेली. या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं. या मतदारसंघातून काँग्रेस सातवेळा निवडणूक जिंकला आहे. या मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने सिन्हा नाराज होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.