Amit Shah Rally In West Bengal : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी बीरभूम जिल्ह्यातील सिऊडी येथील सभेत पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सन २०२४ मध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. सन २०२४ मध्ये भाजपला लोकसभेच्या ३५ हून अधिक जागा जिंकून द्या, तर २०२५ पर्यंत ममता बॅनर्जी यांचे सरकार कोसळणार, असेही ते म्हणाले. (Latest News Update)
यावेळी अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर थेट निशाणा साधला. 'दीदीं'च्या सत्ताकाळात बंगाल बॉम्बस्फोटांचे केंद्र बनले आहे. भाजपचे सरकार येऊ द्या, मग पुन्हा कधीच रामनवमीला हिंसाचाराच्या घटना घडणार नाहीत, असेही शहा म्हणाले.
दरम्यान, अमित शहा हे रामनवमीला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी बीरभूममध्ये भाजपच्या कार्यालयाचे उद्घाटन केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, २०२४ मध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. बंगालच्या जनतेला नव्या वर्षाच्या आधीच शुभेच्छा देत आहे.
यावेळी अमित शहा म्हणाले की, 'देशात पहिल्यांदाच आदिवासी महिलेला राष्ट्रपती करण्याचे काम आमच्या नरेंद्र मोदी यांनी केले. विधानसभा निवडणुकीत बंगालच्या जनतेने ७७ जागा दिल्या आहेत. भाजपसाठी ही मोठी जबाबदारी आहे. बंगाल विधानसभेत दीदींच्या दादागिरीविरोधात लढण्याचे काम आमदार करत आहेत.'
दीदी आणि भाच्याला पराभूत करूनच बंगालला वाचवू शकतो. आयुषमान भारत योजना सुरू व्हावी, असे ममतांना अजिबात वाटत नाही. एकदा बंगालमध्ये भाजपचं सरकार येऊ द्या, ८ कोटी लोकांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत सुविधा देऊ, असे आश्वासनही शहा यांनी यावेळी दिले.
अमित शहा म्हणाले की, पाकिस्तानला सडेतोड उत्तर ममता दीदी देऊ शकतात का? काश्मीरमधून दहशतवाद केवळ मोदीच हद्दपार करू शकतात. अयोध्येत राम मंदिर व्हायला हवे, ममता बॅनर्जी, काँग्रेस, कम्युनिस्ट अडथळे आणत होते. मोदीजींनी अयोध्येत मंदिर उभारलं. देशाला सुरक्षित ठेवायचे असेल आणि समृद्ध करायचे असेल तर मोदींनाच पुन्हा पंतप्रधान करायला हवे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.