Air Pollution in India: वायुप्रदूषणाचा विळखा! दरवर्षी ८० लाखांचा मृत्यू, दर चार मृत्यूंपैकी एक मृत्यू भारतात!

India Air Pollution Deaths: स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०२५ अहवालानुसार, २०२३ मध्ये भारतात वायुप्रदूषणामुळे २० लाखांहून अधिक मृत्यू झाले. PM2.5 प्रदूषणाचा फुफ्फुस, हृदय आणि मेंदूवर कसा परिणाम होतो? लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना कोणते धोके आहेत.
Air Pollution in India
Air Pollution in Indiasaam tv
Published On: 

दिवाळी आली की फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची चर्चा सुरू होते. पण हवेच्या प्रदूषणाचा धोका केवळ सणापुरता मर्यादित नाही. वर्षभर आपण ज्या हवेत श्वास घेतो तीच हवा आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतेय. 'स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०२५' या अहवालातील आकडेवारी याची गंभीरता दाखवते. २०२३ मध्ये जगभरात वायुप्रदूषणामुळे जवळपास ८० लाख लोकांचा मृत्यू झाला. यापैकी तब्बल २०.०६ लाख मृत्यू एकट्या भारतात झाल्याची माहिती आहे. म्हणजेच जगभरात प्रदूषणामुळे होणाऱ्या दर चार मृत्यूंपैकी जवळपास एक मृत्यू भारतात झाला आहे.

ही आकडेवारी देशातील वायुप्रदूषणाची गंभीर परिस्थिती दाखवते. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, कारखाने, कोळशावर चालणारे वीज प्रकल्प, शेतीची कामं आणि घरांमध्ये स्वयंपाकासाठी जाळलं जाणारं लाकूड किंवा कोळसा अशा अनेक गोष्टींमुळे हवा खराब होत आहे. या प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना होऊ शकतो. हवेतील अतिशय बारीक धूलिकण फक्त फुफ्फुसांनाच नाही, तर हृदय आणि मेंदूलाही नुकसान पोहोचवतात. सतत अशा हवेत श्वास घेतल्याने हार्ट अटॅक, स्ट्रोक, मधुमेह आणि लंग कॅन्सरचा धोका वाढतो.

Air Pollution in India
Cancer Drug Prices: मोदी सरकारचा मोठा निर्णय; कॅन्सरची औषधं 70 टक्क्यांनी होणार स्वस्त

भारतात वायुप्रदूषण वाढण्यामागे नेमकी कारणं काय?

भारतातील वायुप्रदूषणासाठी केवळ वाहनांचा धूर किंवा शेतातील जाळल्या जाणाऱ्या गोष्टी जबाबदार नाही. 'स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०२५' च्या अहवालानुसार, PM2.5 प्रदूषण वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. यामध्ये गाड्यांचा धूर, घरांमध्ये वापरलं जाणारं इंधन, कोळशावर चालणारे वीज प्रकल्प, शेती आणि कारखान्यांमधून बाहेर पडणारा धूर, कचरा जाळणे आणि जंगलांना लागणाऱ्या आगी यांचा समावेश आहे.

या अहवालानुसार, २०२३ मध्ये दक्षिण आशिया हा जगातील सर्वाधिक PM2.5 प्रदूषणाचा सामना करणारा भाग होता. या भागातील प्रदूषणाचा मोठा फटका बसलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.

घरात स्वयंपाक करतानाही हवेत पसरतो विषारी धूर

आपल्याला वाटतं की, घरात आपण सुरक्षित आहोत. परंतु घराच्या आतही वायुप्रदूषणाचा धोका असतो. भारतातील अनेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी लाकूड, कोळसा आणि शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जातो. हे इंधन जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर तयार होतो. या धुराचा घरातील लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

अहवालातील माहितीनुसार, स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या या घन इंधनांमुळे बाहेरील PM2.5 प्रदूषणातही जवळपास ३० टक्के भर पडते. म्हणजेच घरात स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचाही बाहेरच्या हवेवर परिणाम होत आहे.

Air Pollution in India
Bladder cancer in dogs: 6 महिन्यांपासून लघवीतून रक्तस्राव, तपासणीत कॅन्सरचं निदान; डॉक्टरांकडून श्वानावर यशस्वी शस्त्रक्रिया

लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रदूषणाचा सर्वाधिक धोका

प्रदूषित हवेचा परिणाम प्रत्येक वयोगटातील व्यक्तीवर होतो. पण लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त त्रास होऊ शकतो. लहान मुलांची फुफ्फुसं आणि शरीरातील इतर अवयव पूर्णपणे विकसित झालेले नसतात. त्यांच्या श्वास घेण्याच्या नळ्याही लहान असतात. त्यामुळे प्रदूषित हवेमुळे शरीरात सूज निर्माण झाली, तर त्याचा परिणाम मुलांवर अधिक गंभीर होऊ शकतो.

गर्भवती महिला प्रदूषित हवेत जास्त काळ राहिल्यास बाळाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. अशा महिलांमध्ये वेळेआधी बाळाचा जन्म होण्याची आणि बाळाचे वजन कमी असण्याची शक्यता वाढते. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांनाही प्रदूषणाचा मोठा धोका आहे. हृदय आणि फुफ्फुसांशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. २०२३ मध्ये जगभरात ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जवळपास ५० लाख लोकांचा मृत्यू वायुप्रदूषणाशी संबंधित कारणांमुळे झाला.

Air Pollution in India
Cancer Drug Prices: कॅन्सरच्या औषधांच्या किमतीत मोठी कपात! 1364 औषधांची नवी MRP आजपासून लागू; रुग्णांना होणार 3540 कोटींचा फायदा

प्रदूषणामुळे फक्त फुफ्फुसंच नाही तर हृदय आणि मेंदूलाही धोका

वायुप्रदूषण म्हटलं की, सर्वप्रथम श्वास घेण्यास होणारा त्रास किंवा फुफ्फुसांचे आजार डोळ्यांसमोर येतात. पण प्रदूषणाचा परिणाम यापेक्षा खूप मोठा आहे. अहवालानुसार, PM2.5 मधील अतिशय बारीक धूलिकण श्वासातून फुफ्फुसांमध्ये जातात. त्यानंतर ते रक्ताद्वारे शरीराच्या इतर भागांपर्यंत पोहोचू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.