M.S. Swaminathan: कृषी शास्त्रज्ञ स्वामीनाथन यांनी बदलला देशातील शेतीचा चेहरा; स्वामीनाथन यांच्या 'या' गोष्टी माहिती आहेत का?

M. S. Swaminathan: स्वामीनाथन हे भारतातील लोकप्रिय शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात.
M.S. Swaminathan
M.S. Swaminathansaam TV
Published On

Father of First Green Revolution :

स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचे आज निधन झाले. त्यांनी चेन्नईत अखेरचा श्वास घेतला. स्वामीनाथन हे भारतातील लोकप्रिय शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. धानाच्या उच्च-उत्पादक जाती विकसित करण्यात स्वामिनाथन यांचा मोठा वाटा होता.

तामिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यात स्वामीनाथन यांचा जन्म झाला. १९६० च्या दशकात तेव्हा भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. त्यावेळी देशात मोठ्या प्रमाणात दुष्काळाची शक्यता होती, तेव्हा उच्च उत्पादन देणार्‍या गहू आणि तांदळाच्या वाणांची त्यांनी भारताला ओळख करून दिली. (Latest News)

यासाठी त्यांना प्रथम जागतिक अन्न पुरस्कार देण्यात आला होता. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी त्यांनी काही शिफारशी केल्या होत्या, मात्र आजपर्यंत या शिफारशींची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. दरम्यान सरकार आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाल्याचं सांगते, परंतु अद्याप त्याची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची मागणी शेतकरी आंदोलनातून वारंवार करत आहेत. १८ नोव्हेंबर २००४ रोजी स्वामिनाथन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाचे नाव राष्ट्रीय शेतकरी आयोग आहे आणि त्याचे अध्यक्ष एमएस स्वामीनाथन होते. त्यांच्या नावावरूनच या आयोगाला स्वामीनाथन आयोग असं नाव देण्यात आलं होतं.

संशोधन कारकीर्द

जागतिक अन्न पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली. जागितक अन्न पुरस्कार त्यांना गहू आणि तांदळाच्या जाती भारतात आणल्याबद्दल देण्यात आला होता. स्वामिनाथन यांनी १९४९ मध्ये बटाटा, गहू, तांदूळ आणि तागावर संशोधन करून कारकीर्द सुरू केली. १९६० च्या दशकात, जेव्हा भारत मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या उंबरठ्यावर होता.

त्यावेळी स्वामिनाथन आणि नॉर्मन बोरलॉग आणि इतर शास्त्रज्ञांनी गव्हाच्या उच्च उत्पादनाच्या जातीचे बियाणे विकसित केले. यामुळे भारतातील पारंपारिक शेतीपासून बियाणे आणि संबंधित तंत्रांच्या उच्च-उत्पादक वाणांच्या माहिती मिळण्याकडे संक्रमण झालं. त्यामुळे भारतात हरितक्रांती झाली.

स्वामिनाथन यांनी विविध कृषी संशोधन प्रयोगशाळांमध्ये प्रशासकीय पदे भूषवली आहेत. त्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषद आणि नंतर आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे महासंचालक म्हणून काम केले. १९७९ मध्ये त्यांनी कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिवाची जबाबदारी संभाळली होती. त्यानंतर १९८८ मध्ये एमएस स्वामिनाथन हे इंटरनॅशनल युनियन ऑफ द कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेसचे अध्यक्ष झाले होते.

स्वामिनाथन यांनी कृषी विज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी अनेक पुरस्कार आणि प्रशंसा मिळवलीय. स्वामीनाथन यांना १९६१ मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार आणि १९८६ मध्ये अल्बर्ट आइनस्टाइन जागतिक विज्ञान पुरस्कार देण्यात आला होता.

पोलीस ऑफिसर न होता झाले कृषी शास्त्रज्ञ

स्वामीनाथन यांनी हे १९४७ साली ते दिल्लीच्या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी रवाना झाले. १९४९ मध्ये विशेष प्रावीण्यासह त्यांनी ती पदवी प्राप्‍त केली. युनियन पब्लिक सर्व्हिसची परीक्षा देऊन ते भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले. मात्र त्यांनी पोलीस ऑफिसर न होता कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले.

नेदरलॅंडमध्ये बटाटाच्या अनुवांशिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी १९५२ मध्ये पी‍एच.डी. केली. जगभरांतील कृषी विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी कृषिसंशोधनाबरोबर वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन या विषयांवर काम केले आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय संस्थेत तांदळावर संशोधन करण्याची संधी त्यांना मिळाली.

या ठिकाणी त्यांनी तांदळाच्या जपानी आणि भारतीय जातींवर संशोधन केलं. १९६५ मध्ये कोशा येथील एका संस्थेत त्यांना नोकरी मिळाली. येथे त्यांना गव्हाच्या संशोधन कार्याची जबाबदारी देण्यात आली. त्याचबरोबर तांदळावरही त्यांचे संशोधन चालूच होते. स्वामीनाथन यांनी गव्हाचे HYV बियाणे विकसित केले.

संशोधन करून निर्माण केलेले गव्हाचे बियाणे उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्ली येथील शेतकर्‍यांना वाटण्यात आले. परिणामी त्या वर्षी भारतात गव्हाचे भरघोस उत्पादन निघाले. भारतीय गरीब शेतकर्‍यांच्या शेतात गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते.

कुटुंबात तीन मुली

स्वामीनाथन यांच्या पश्चात तीन मुली असा परिवार आहे. सौम्या स्वामीनाथन या एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी २०१९ -२०२२ पर्यंत जागतिक आरोग्य संघटनेत (WHO)मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम केले. त्यांनी जानेवारीच्या सुरुवातीला MSSRFचे अध्यक्षपद स्वीकारले.

दुसरी मुलगी मधुरा स्वामीनाथन भारतीय सांख्यिकी संस्थेत अर्थशास्त्राची प्राध्यापक आहेत. तर धाकटी मुलगी नित्या स्वामीनाथन ही इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लियामध्ये लिंग विश्लेषण विषयाची व्याख्याता आहेत.

M.S. Swaminathan
Government Scheme : Fertilizer Seeds Complaints | शेती संबंधीची तक्रार एका सेकंदात सरकार दरबारी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com