Delhi Cm Atishi Marlena : आम आदमी पक्षाच्या दिग्गज नेत्या आणि अरविंद केजरीवाल यांच्या निकतवर्तीय आमदार आतिशी मार्लेना यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आतिशी यांच्यासोबत पाच मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल वीके सक्सेना यांनी आतिशी यांच्यासहित पाच कॅबिनेट मंत्र्यांना शपथ दिली.
आतिशी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून २०२० साली निवडणूक जिंकल्या होत्या. त्या केजरीवाल सरकारमध्ये एकमेव महिला मंत्री होत्या. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी आपच्या बैठकीत आतिशी यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड झाली. अरविंद केजरीवाल यांना काही दिवसांपूर्वी कथित दारू घोटाळा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला.
जामीन मंजूर झाल्यानंतर काही दिवसांनी केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी आतिशी यांची निवड करण्यात आली होती. केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर मनीष सिसोदिया देखील मुख्यमंत्रिपद सांभाळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आतिशी यांची निवड करण्यात आली.
आज आतिशी यांच्यासहित सौरभ भारद्वाज, गोपाल राय, कैलाश गहलोत आणि इमरान हुसैन यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. हे सर्व नेते अरिविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात होते. आतिशी यांच्या मंत्रिमंडळात मुकेश अहलावत हा नवा चेहरा आहे.
दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणाऱ्या तिसऱ्यांदा महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. याआधी दिल्लीचं मुख्यमंत्रिपद भाजच्या महिला नेत्या सुषमा स्वराज, काँग्रेसच्या शीला दीक्षित या महिलांनी भूषवलं आहे. आतिशी मार्लेना या पंजाबच्या राजपूत कुटुंबातील आहेत. त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे.
दिल्लीत पहिल्यांदा २०२० साली आमदार म्हणून निवडून आल्या. पुढे २०२३ साली आतिशी यांना केजरीवाल यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदाचा मान मिळाला. २०२३ साली मंत्रिपदाचा मान मिळाल्यानंतर आता अवघ्या एका वर्षांत त्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील एका मतदारसंघातून त्यानी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत आतिशी यांचा पराभव झाला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.