गेल्या पाच वर्षांत किमान 633 भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशात मृत्यू झाला आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी शुक्रवारी लोकसभेत ही खळबळजनक माहिती दिली. अहवालानुसार, या मृत्यूंना नैसर्गिक कारणांव्यतिरिक्त इतर घटकही जबाबदार आहेत. भारतीय विद्यार्थ्यांचा सर्वाधिक मृत्यू कॅनडामध्ये झाला असून, गेल्या पाच वर्षांत येथे 172 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
या अहवालानुसार, कॅनडानंतर अमेरिकेत सर्वाधिक 108 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. इतर देशांमध्ये इंग्लंडमध्ये 58, ऑस्ट्रेलियात 57, रशियामध्ये 37, जर्मनीमध्ये 24, युक्रेनमध्ये 18, जॉर्जिया, किर्गिस्तान आणि सायप्रसमध्ये प्रत्येकी 12 आणि चीनमध्ये 8 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत माहिती देताना किर्तीवर्धन सिंह म्हणाले की, इतक्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूमागे नैसर्गिक कारणांव्यतिरिक्त इतरही कारणे आहेत. यातील 19 विद्यार्थ्यांनी दहशतवादी हल्ल्यात आपला जीव गमावला. यात कॅनडामध्ये 9 आणि अमेरिकेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
याशिवाय गेल्या तीन वर्षांत 48 भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले. कीर्तीवर्धन सिंह म्हणतात की, हद्दपारीच्या कारणाबाबत कोणताही विशिष्ट अधिकृत अहवाल नाही. परदेशातील विद्यार्थ्यांचे व्हिसा विविध कारणांमुळे रद्द केले जाऊ शकतात.
लोकसभेत कीर्तीवर्धन सिंह म्हणाले की, "भारत सरकार परदेशात भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंतित आहे. मंत्रालयाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत परदेशात भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची 633 प्रकरणे समोर आली आहेत. परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही भारत सरकारची जबाबदारी आहे.''
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.