मुंबई: उद्या, ५ ऑक्टोबरला जेव्हा देशभरात दसरा साजरा होत असेल तेव्हाच महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घटना घडणार आहे. शिवसेना (Shivsena) या एकाच पक्षाचे दोन मेळावे होणार आहेत. एक म्हणजे ठाकरे गटाचा दसरा मेळावा आणि दुसरा म्हणजे शिंदे गटाचा मेळावा. दोन्ही गटांच्या मेळाव्यात एकमेकांवर जोरदार टोलेबाजी होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतून बंडखोरी करुन मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे या दोघांमध्ये जोरदार लढत होणार आहे. अशात या दोन्ही नेत्यांनी ऐकण्यासाठी अवघा महाराष्ट्र कान लावून बसला आहे. या सगळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपण कुणाचे भाषण ऐकणार आहोत आणि आपला आवडता नेता कोणता आहे याबाबत स्पष्टच सांगितलं आहे. (Maharashtra News)
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषण करणार आहे. या दोन्ही नेत्यांची भाषणं ऐकण्यासाठी शिवसैनिकांसह राजकीय क्षेत्रातील सर्वच लोक उत्सुक आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कात होणार आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाचा दसरा मेळावा हा बीकेसी मैदानावर होणार आहे. यावेळी हे दोन्ही नेते काय बोलतात याकडे सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत. याबाबत आता अमृता फडणवीसांनीही आपलं मत मांडलं आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी आपण कुणाचं भाषण ऐकणार आणि तुमचा फेव्हरेट नेता कोण? असं विचारलं असता अमृता फडणवीस म्हणाल्या, "पॉलिटिकली आपण प्रत्येक नेत्याचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेणं चांगलं असतं त्यामुळे मी दोघांचं भाषण ऐकेन. पण वैयक्तिकरित्या एकनाथ शिंदे माझे फेव्हरेट आहेत." असं म्हणत अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले फेव्हरेट नेते असल्याचं जाहीर केलं आहे. अमृता फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं कोल्डवॉर राजकीय वर्तुळात सर्वांनाच ठाऊक आहे. दोघांनीही एकमेकांवर अनेकदा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे टीका केलेली आहे.
दरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन वेगळे मेळावे होत असल्याने दोन्ही गटातील नेत्यांनी आपापल्या मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी ताकद लावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी तब्बल १७०० हून अधिक एसटी बसेस बुक केल्या आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने १४०० खासगी बस आरक्षित केल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.