
नितीन पाटणकर, साम टीव्ही
पुणे : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. वाल्मिक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी मिळाली आहे. वाल्मिकला बीडच्या केजमधील तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. याच वाल्मिक कराडने त्याला स्लीप अॅपनियाचा आजार झाल्याचा दावा केला आहे. यासाठी त्याने केज न्यायालायत धाव घेत कोर्टात याचिका दाखल करून २४ तास मदतनीस मिळावा, अशी मागणी केली आहे. याच वाल्मिक कराडला झालेला 'स्लीप अॅपनिया' आजार नेमका काय आहे, जाणून घेऊयात.
वाल्मिक कराडने केज न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत मदतनीस मिळावा अशी मागणी केली आहे. 'मला 'स्लीप अॅपनिया' नावाचा आजार असून झोपेत श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ऑटो सीकॅप मशीनची आवश्यकता असते. या मशीनमुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करतं. हीच मशीन लावण्यासाठी मदतनीस पाहिजे, अशी मागणी वाल्मिक कराडने याचिकेद्वारे मांडली. वाल्मिक कराडला झालेला 'स्लीप अॅपनिया' नावाचा आजार नेमका काय आहे, याविषयी आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी भाष्य केलं.
डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ' ॲाबस्ट्रेक्टीव स्लीप अॅपनिया म्हणजे दीर्घकाळ चालणारं घोरणं, असा त्याचा मराठीत अर्थ होऊ शकतो. या आजारात घशाच्या मागच्या बाजूचे स्नायू सैल पडलेले असतात. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. धूम्रपणामुळे स्लीप अॅपनिया होऊ शकतो. लहान मुलांमध्ये टॉन्सिल्समुळे देखील हा आजार होतो. झोपेत श्वास घेण्याची क्रिया काही काळासाठी किंवा सेकंदासाठी या आजारात थांबते. त्यामुळे हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे. या आजारात हृदय बंद पडू शकतं, तसेच दीर्घकाळ श्वास थांबला तर मृत्यू देखील होऊ शकतो'.
'श्वास थांबल्यामुळे हृदयाला आणि मेंदूला ऑक्सिजन पुरवठा बंद होतो, त्याचे शरीरावर इतरही परिणाम होतात. जागेपणी श्वासावरती नियंत्रण ठेवू शकतो. मात्र झोपेत श्वासावर नियंत्रण ठेवता येत नाही. कारण आपले सर्व स्नायू सैल पडलेले असतात. त्यामुळे झोपेत या आजाराचा त्रास होतं. प्रत्येक घोरणं हे स्लीप अॅपनिया असत नाही. वजन कमी करणे,टॉन्सिल्स काढणं, धूम्रपान बंद करणे हे त्यावर उपाय आहेत, असे डॉ. भोंडवे यांनी सांगितलं.
'सी पॅप हे उपकरण या आजारातील रुग्णांसाठी वापरला जातं. सी पॅपमुळं सतत ऑक्सिजन पुरवठा झोपेत रुग्णाला होत राहतो. मात्र यामध्ये सहाय्यक बरोबर असण्याची आवश्यकता नाही. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर स्वतः हे यंत्र वापरता येतं. तसेच शस्त्रक्रिया करून देखील हा आजार दूर केला जाऊ शकतो. स्लीप अॅपनिया आहे की नाही हे वैद्यकीय चाचण्या करून ठरवले जाऊ शकते, असे डॉ. भोंडवे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.