अजय दुधाणे
बदलापूर: ठाण्यातील बदलापूर आणि रायगडमधील कर्जत-खोपोली भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं उल्हास नदीला पूर आला आहे. उल्हास नदीचं पाणी बदलापूर-कर्जत राज्यमार्गावर आलं आहे. चामटोलीजवळ हा मार्ग पाण्याखाली गेला आहे. या पुराच्या पाण्यात अनेक वाहने अडकली होती. या पुराच्या पाण्यातून काही वाहने बाहेर काढण्यात आली. दरम्यान, हा मार्ग वाहतुकीसाठी तूर्तास बंद करण्यात आला आहे. (Badlapur Flood Updates)
ठाणे (Thane) आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळला. पावसाचं धुमशान सुरूच आहे. या मुसळधार पावसामुळे कर्जतकडून बदलापूर आणि पुढे वाहत येणाऱ्या उल्हास नदीला पूर (Ulhas River Flood) आला आहे. नेरळ आणि कळंब मार्गावरील दहिवली येथील पूलही पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे, उल्हास नदीचे पाणी चामटोलीजवळ बदलापूर-कर्जत राज्यमार्गावर आले आहे. हा राज्यमार्ग पाण्याखाली गेला आहे. (Badlapur-Karjat Road)
बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग चामटोलीजवळ पूर्ण पाण्याखाली गेला आहे. या महामार्गावर उल्हास नदीचं पाणी आलं असून, हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उल्हास नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर दरवर्षी बदलापूरजवळच्या चामटोली गावाजवळ कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली जातो. याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी महालक्ष्मी एक्सप्रेस देखील उल्हास नदीच्या पुराच्या पाण्यात अडकून पडली होती. यानंतर आज मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचं पाणी पुन्हा एकदा या महामार्गावर आलं आहे. त्यामुळे हा महामार्ग बंद झाला आहे. बदलापूर ग्रामीण पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. तर वांगणी दिशेला अडकलेल्या काही गाड्या या पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आल्या.
उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कर्जत-कल्याण राज्यमार्गावर चामटोली-कासगाव दरम्यान पुराचे पाणी आले आहे. कुठलेही वाहन अडकून बंद पडू नये, जिवीतहानी होऊ नये यासाठी वांगणी चौकात आणि सह्याद्रीजवळ नाकाबंदी केली असून रस्ता बंद केला आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. कुणीही रस्त्यावर पाणी असल्यास वाहने पुढे घेऊन जाऊ नये, असे आवाहन बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक भोई यांनी केले आहे.
Edited By - Nandkumar Joshi
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.