Pune Crime News : विकी कौशल आणि रश्मिका मंधाना यांचा छावा तिकिट खिडकीवर धुमाकूळ घालत आहे. मुंबई, पुण्यासह देशभरात छावा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होत आहे. अट्टल गुन्हेगारांनाही छावा चित्रपट पाहण्याचा मोह आवरला नाही अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पुणे पोलिसांनी गनिमी कावा करत सराईत आरोपींना हडपसर येथील चित्रपट गृहाच्या बाहेरच बेड्या ठोकल्या. हडपसर मधील एका मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी दोघे आले. मात्र चित्रपटाऐवजी त्यांना गजाआड व्हावे लागले. मकोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद केले. (Police Trap MCOCA Offenders at 'Chhava' Movie Screening in Pune)
छावा चित्रपट पाहायला आलेल्या २ सराईत गुन्हेगारांना पुणे गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. हडपसर भागात पोलिसांनी ही कारवाई केली. धर्मेनसिंग उर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा (वय २२) आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (वय २३) दोघेही रा. शिव कॉलनी, आदर्श नगर, दिघी असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींवर यापूर्वी मकोका, तसेच एनडीपीएस कायदा तसेच शस्त्र कायद्याअन्वये दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
दिघी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. ते अनेक दिवसापासून फरार होते. यूनिट सहा हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असताना पोलीस कर्मचारी नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना भादा व भोंड हे हडपसर मधील चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यांना दिघी पोलिस ठाण्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.