गिरीश कांबळे, ता. २५ सप्टेंबर
Uddhav Thackeray On Amit Shah: राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी- अमित शहांचे दौरे सुरु झाले आहेत. सध्या गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी अमित शहा यांनी शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना रोखा, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले. यावरुनच आता उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस वैजापूरचे डॉ. दिनेश परदेशी यांनी आज दुपारी बारा वाजता मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. वैजापूर विधानसभा मतदारसंघात दिनेश परदेशी यांनी दोनदा विधानसभा निवडणूक लढवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वैजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास दिनेश परदेशी इच्छुक आहेत, त्यामुळेच त्यांनी ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे. मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर तोफ डागली.
"आता मोदी-शहांचा उलटा प्रवास चालू झाला आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीमधून आपल्याकडे आला. भारतीय जनता पार्टीच्या कट्टर कार्यकर्त्यांना मी सांगतो तुमच्यामध्ये भेसळीचा कार्यक्रम चालू झाला आहे. काल महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार बुणगे इकडे येऊन गेले आणि आपल्याला खतम करायची भाषा बोलून गेले. या बाजार बुणग्यांना महाराष्ट्र टाचेखाली घ्यायचा आहे," असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
तसेच "त्यांना कल्पना नाही हा महाराष्ट्र विरांचा महाराष्ट्र आहे. आज मी जास्त बोलत नाही. सभेला सुरुवात झाल्यावर आपल्या तोफा या धडधडणार आहेत. हा बाजार बुणगा नागपूरला येऊन गेला आणि उद्धव ठाकरे यांना खतम करा आणि शरद पवारांना खतम करा, असं म्हणाला. हिम्मत असेल तर येऊन बघ महाराष्ट्र तुला खतम करेल," असे थेट आव्हानही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. तसेच यावेळी त्यांनी डॉ. दिनेश परदेशी यांचे शिवसेना ठाकरे गटामध्ये स्वागत केले. वैजापूर हा आपला मतदारसंघ आहे, तिकडे विजय आपला विजय होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.