शिवसेनेचा पराभव करणे नारायण राणे यांच्या सारख्यांना कधीच जमणार नाही. एखाद्या पराभवाने खचणारी व मागे हटणारी शिवसेना नाही, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून करण्यात आला. राणे व त्यांच्या कुटुंबास शिवसेनेने तीनदा धूळ चारली. चौथ्यांदाही पराभव होईल, असा घणाघातही सामना अग्रलेखातून करण्यात आला.
मनुष्य विजयाने नम्र होतो. राण्यांचे उलटे आहे. ते विजयाने हिंस्र व बेफाम होतात. मोदी–फडणवीस–शहांचे तसेच झाले होते. महाराष्ट्राने त्यांचा पराभव केला, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली. जपचा आकडा महाराष्ट्रात नऊवर आला. या नऊमधले काही जण तर घातपाताने किंवा अपघाताने जिंकले. त्यातील एक महामानव म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे हे आहेत, असा टोला सामनातून लगावण्यात आला.
निवडणुकीत राणे हे काही जिंकण्याच्या स्थितीत नव्हते. मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा त्यांचा विजय आहे. आता श्रीमान राणे यांनी दावा केला आहे की, ‘‘लोकसभा निवडणुकीत कोकणातील शिवसेना आपण संपवली. यापुढे कोकणात कुणाला थारा देणार नाही. आमच्या आडवे कोण आले तर त्यांची जागा दाखवून देऊ.’’ नारोबांचे हे फूत्कार भाजपच्या अहंकारी वृत्तीस साजेसे आहेत, अशी टीकाही सामनातून करण्यात आली.
राणे हे कधीकाळी शिवसेनेत होते. शिवसेनेत मुख्यमंत्रीपदापर्यंत सर्व पदे भोगून त्यांनी पक्ष सोडला. राणे हे शिवसेनेमुळे आर्थिकदृष्टय़ा संपन्न झाले. त्यांच्या घरावर सोन्याची कौले व डोक्यावर झुपकेदार केसांचा टोप चढला, पण खाल्ल्या घरचे वासे मोजावेत तसे त्यांचे वर्तन घडले. राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये जाताना त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर घाणेरडी टीका केली. खासगीत ते भाजप नेत्यांवरही हवे ते बोलतात, असं सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आलं.
कोकणात या वेळी नारायण राणे कसे जिंकले त्याचे पुरावे समोर आले आहेत. घरात पैशांची पाकिटे पोहोचवून, पाठवून, लोकांना भ्रष्ट करून, मते विकत घेऊन राणे यांनी हा विजय मिळविल्याचे कॅमेऱ्यावर स्पष्ट दिसते. निवडणूक यंत्रणा व जिल्हय़ाची प्रशासकीय यंत्रणा मिंधी व बुळी असल्यानेच राणे यांना 48 हजार मतांनी खासदारकीचा टोप डोक्यावर चढवता आला, पण मते विकत घेण्याचा हा प्रकार कोर्टात पोहोचल्याने राणे यांची खासदारकी औटघटकेची ठरू शकते, असा घणाघात सामना अग्रलेखातून लगावण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.