निवृत्ती बाबर -
मुंबई: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) यांनी कालच्या मुंबई दौऱ्यात महापालिकेसाठी रणशिंग फुंकल्यानंतर आज लगेच शिवसेनेने देखील पालिकेच्या निवडणुकांसाठी कंबर कसल्याचं दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत आज मातोश्रीवर शिवसेना विभागप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईतील सर्व विभागप्रमुख आणि विभाग महिला संघटक या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल शिवसेनेला (Shivsena) आगामी निवडणुकांमध्ये भूईसपाट करा असा आदेशच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिला. शिवाय येऊ घातलेली महापालिका निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक आहे असं समजून लढा, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल कार्यकर्त्यांना दिलं आहे.
पाहा व्हिडीओ -
भाजपच्या (BJP) कालच्या सर्व घडामोडी पाहता आता शिवसेना देखील भाजपची रणनिती भेदण्यासाठी चक्रव्युव रचत असून त्याबाबतच्या हालचाली करत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या विभागप्रमुखांच्या बैठकीचे 'मातोश्री'वर आयोजन करण्यात आलं आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ज्या मुंबई महापालिकेकडे पाहिलं जातं त्या महापालिकेवरती आपला झेंडा फडकावणं हे भाजपचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न आहे. मात्र, युतीधर्म आड येत असल्या कारणाने आजपर्यंत त्यांना आपला मनसुभा साध्य करता आला नाही.
मात्र, शिवसेनेने भाजपची सोडलेली साथ, शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे भाजप आता साम, दाम, दंड, भेदाचा अवलंब करुन आपली सत्ता पालिकेवर आणण्याचा प्रयत्न करत आहे. तसं वक्तव्य देखील शहा आणि फडणवीसांनी काल केली आहेत.
याच सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आजच्या बैठकीचं आयोजन हे आगामी महापालिकेच्या (BMC) निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने महत्वाचं आहे. अमित शहा यांनी काल केलेले वक्तव्य, भाजपकडून सुरू असलेली तयारी याचाही आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.
खासदार अरविंद सावंत, सुनील राऊत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार भास्कर जाधव तसेच मुंबईतील विभागप्रमुख आणि महिला संघटक या बैठकीसाठी उपस्थित आहेत. तर शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर भास्कर जाधव पहिल्यांदाज उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर आले आहेत. त्यामुळे आता भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेनेने देखील कंबर कसल्याचं दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.