संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बेजबाबदार बाईकस्वाराने दिड वर्षांच्या मुलीला चिरडलं
ही घटना टायगर केज रोड परिसरात घडली असून चिमुरडीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं
गंभीर दुखापतीमुळे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं
पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार बाईकस्वाराचा शोध सुरू केला आहे
दिवाळीत आपल्या मुलीला सुट्टी निमित्त कौतुकाने फिरायला घेऊन गेलेल्या वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बोरीवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात एका दुचाकी स्वाराच्या बेजबाबदारपणामुळे बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दिड वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुंबईतील वाहन कोंडीची समस्या काही नवीन नाही. तसेच काही वाहनचालक हायस्पीडने गाडी चालवत वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत वाहन चालवतात. अशा प्रकारामुळे अनेक अपघात घडत आहेत. अशीच एक घटना मुंबईतील संजय गांधी नॅशनलपार्क येथे घडली.मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील एरोली परिसरात राहणारा सुजीत यादव आपल्या कुटुंबियांसह पार्कमध्ये फिरायला आला होता. सुजित आणि त्याचे कुटुंब संजय गांधी नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वाराजवळील टायगर केज रोड परिसरात थांबले होते. या दरम्यान सुजीतची दीड वर्षांची मुलगी मानसी यादव रस्त्याच्या कडेला खेळत असताना अचानक एक वेगवान रॉयल एनफिल्ड बाईक तिला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की ती काही मीटर अंतरावर फेकली गेली.
अपघातानंतर तिला तत्काळ कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत आणि जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुलीच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, पार्कमध्ये आलेल्या पर्यटकांमध्येही संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान मुलीला कौतुकाने फिरायला घेऊन गेलेल्या वडिलांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. तसेच चिमुकलीच्या कुटुंबियांवर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटना घडल्यानंतर दुचाकीस्वाराने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या दुचाकीस्वाराला शिक्षा होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.