ठाणे महापालिकेच्या हद्दीतील रस्ते सुधारले असले तरी घाटापुढील रस्त्यांची अवस्था बिकट
मिरा-भाईंदर हद्दीतील खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी
‘रॅपिड काँक्रीट’ने दुरुस्तीच्या सूचना, पण प्रत्यक्ष काम सुरू नाही
कोंडीचा फटका ठाणेकरांपासून मुंबई-अहमदाबाद महामार्गापर्यंत
ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर ठाणे महापालिकेच्या हद्दीत रस्ता रुंदीकरणाची कामे सध्या गतीने सुरू आहेत. विविध प्रकल्प एकाच वेळी राबवले जात असून, त्यात ठाणे महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए आणि मेट्रो प्रशासन यांचा समावेश आहे. या सर्व कामांदरम्यान वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी वाहतूक विभागाकडून घेतली जात आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक सध्या नियंत्रणात आहे. मात्र, मिरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीत रस्त्यांची दुरवस्था ही ठाणेकरांसाठी मोठी अडचण ठरत आहे. विशेषतः गायमुख घाट ओलांडल्यानंतर रस्त्यांवरील खड्डे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
गायमुख घाटाच्या ठाणे महापालिका हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबराचे मास्टिंग करून घाटाच्या चढावर सुधारणा केली आहे. त्यामुळे वाहन बंद पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र घाट संपताच, माथ्यापासून पुढे रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दोन्ही बाजूला खोल खड्डे पडलेले असून, काही ठिकाणी रस्ते संपूर्ण उखडलेले आहेत. यामुळे वाहनांची गती अत्यंत मंदावली आहे आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. विशेषतः सकाळी आणि रात्री जड वाहने या रस्त्यावर कासवगतीने सरकत असल्यामुळे माजिवडा ते फाउंटन हॉटेल आणि फाउंटन हॉटेल ते माजिवडा या दोन्ही दिशांनी हजारो वाहनांची गर्दी दिसून येते.
या मार्गावरील ठाणे ते फाउंटन हॉटेल हे सुमारे १० किमी अंतर कापण्यासाठी नेहमी १० ते १५ मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र सध्या हेच अंतर पार करताना वाहनचालकांना तास ते दीड तास लागतो. ठाणे महापालिकेच्या हद्दीतील घोडबंदर रस्त्याचे सहा पदरीकरण तसेच सेवारस्त्यांचे एकत्रीकरण सुरू असल्याने त्या भागातील वाहतूक सुरळीत होत आहे. पण घाटाच्या पुढील रस्त्यांची दुरवस्था ही वाहतूक कोंडीचे मुख्य कारण बनली आहे.
यासंदर्भात ठाणे महापालिका आयुक्तांनी अलीकडेच एक बैठक घेऊन फाउंटन हॉटेलपासून गायमुख घाटापर्यंतचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यासाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रीट तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मिरा-भाईंदर महापालिकेला दिले आहेत. हे तंत्रज्ञान कमीत कमी वेळात रस्त्याची मजबुतीकरणाची कामे पूर्ण करू शकते, आणि वाहतूक बंद न करता दुरुस्ती शक्य होते. आयुक्त राव यांनी स्पष्ट केले होते की, हा प्रयोग यशस्वी ठरल्यास संपूर्ण घाट परिसरात याच तंत्राचा वापर करून वाहतूक सुरळीत केली जाईल.
मात्र, मिरा-भाईंदर महापालिकेकडून अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सारा ताण ठाणेकरांवर पडत आहे. फाउंटन हॉटेल ते गायमुख घाट या ठाण्याकडे येणाऱ्या मार्गाची अवस्था फारच बिकट झाली आहे. या रस्त्यावर खडी टाकून डांबराने ग्राऊटिंग केले असले तरी, रस्ता वारंवार उखडतो आहे. त्यामुळे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकते. काही वेळा वाहनचालक रस्ता चुकवून उलट्या दिशेने गाड्या चालवतात, परिणामी वाहतूक व्यवस्था पूर्णतः विस्कळीत होते.
ही परिस्थिती केवळ ठाण्यातच नव्हे, तर चिंचोटी आणि मिरा रोडसारख्या भागांपर्यंत परिणाम करत आहे. धीम्या वाहतुकीचा फटका संपूर्ण घोडबंदर मार्गाला बसत आहे. नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, रस्त्यांचे काम लवकर सुरू झाले नाही तर ही अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण काय आहे?
मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्डे हे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण आहे.
ठाणे महापालिकेने वाहतूक सुरळीत करण्यासाठी काय उपाययोजना केली आहे?
रस्ता रुंदीकरण, सहा पदरीकरण व सेवारस्त्यांचे एकत्रीकरण सुरू केले आहे.
रस्ता दुरुस्तीसाठी कोणते नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा प्रस्ताव आहे?
‘रॅपिड हार्डनिंग काँक्रीट’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत वाहनचालकांना किती वेळ लागतो?
फाउंटन हॉटेल ते ठाणे हे १० किमी अंतर पार करण्यासाठी सध्या तास ते दीड तास लागतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.