Girish Chaudhari Granted Bail: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) गिरीष चौधरी यांना आज जामीन दिला आहे. जामीन देताना कोर्टाने ईडीवर ताशेरे सुद्धा ओढल्याची माहिती आहे.
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने ७ जुलै २०२१ रोजी चौधरी यांना अटक केली होती. २०१६ मध्ये खडसे राज्याचे महसूल मंत्री असताना, त्यांच्यावर भोसरी भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता.
एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून अत्यंत कवडीमोल भावात आपल्या नातेवाइकांच्या नावाने खरेदी केल्याची तक्रार पुणेस्थित उद्योगपती हेमंत गावंडे यांनी २०१६ मध्ये बंडगार्डन पोलिस ठाण्यात केली होती.
या तक्रारीच्या आधारे एसीबीने खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी आणि मूळ भूखंड मालक अब्बास उक्कानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे खडसे यांनी हा आरोप फेटाळला होता.
तसेच या प्रकरणी आयकर खाते आणि एसीबीने क्लीन चिट दिल्याचा दावाही त्यांनी केला होता. हा घोटाळा चव्हाट्यावर आल्यानंतर खडसेंना फडणवीस मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता.
दरम्यान, चौधरी यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता, की या व्यवहारामध्ये सरकारचं कोणतंही नुकसान झालं नव्हतं. तसेच या जागेसाठी एमआयडीसीची एनओसी घेण्याचीही आवश्यकता नव्हती. या दोन्ही बाबी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या असून चौधरी यांना जामीन मंजूर केला आहे. जामीन देताना कोर्टाने ईडीवर ताशेरे देखील ओढले असल्याची माहिती आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.