

पुण्यात शिवसेनेची नवीन टीम तयार होणार
निवडणुकीतील सुमार कामगिरीनंतर शिवसेनेचा निर्णय
नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार
पुणे शहरातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची नवीन टीम तयार होणार असल्याची समोर आली आहे. आधी झालेल्या विधानसभा आणि नंतर पुणे महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या सुमार कामगिरीनंतर आता पुणे लोकसभा तसेच पुणे शहरातील शिवसेनेची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त केली जाणार असून नव्या चेहऱ्यांना संधी मिळून नवीन कार्यकारणी संदर्भातील नियुक्त्या लवकरच जाहीर होणार आहेत.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आधी युतीमध्ये लढण्याची तयारी दर्शवलेल्या शिवसेनेने एकला चलो रे चा नारा देत स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवली मात्र पक्षाला एका ही ठिकाणी यश मिळालं नाही. पुणे शहरातील 41 प्रभागांपैकी शिवसेनेने बहुतांश सगळ्याच प्रभागात आपले उमेदवार दिले होते.
निवडणुकीच्या पूर्वतयारी दरम्यान शिवसेना आणि भाजप पुणे शहरात एकत्र लढणार अशी चर्चा होती. कालांतराने मात्र शिवसेनेला भाजपकडून मिळालेला प्रस्ताव मंजूर नसल्याने शिवसेनेने शहरात कोणाची मदत न घेता निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं ठरवलं. ए बी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षातील वरिष्ठ मंडळींकडून या फॉर्मची वाटणी झाली.
प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत यासह शिवसेनेतील अनेक नेत्यांच्या सभा सुद्धा पुण्यात आयोजित केल्या गेल्या मात्र पुणेकरांनी शिवसेनेला साथ दिली नाही. 41 प्रभागांपैकी एका ठिकाणी सुद्धा शिवसेनेला खातं फोडता आलं नाही.
दरम्यान आज पुण्यातील एका हॉटेलमध्ये राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, शहर प्रमुख नाना भानगिरे, शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर, अजय भोसले यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीवेळी महानगरपालिका निवडणुकीतील पराभवाचे चिंतन केलं गेलं आणि त्यासोबतच येणाऱ्या काळात पक्षाची नवी रणनीती काय असेल तसंच पुणे शहरातील कुठल्या मुद्द्यांवर काम करणे अपेक्षित आहे यावर सुद्धा चर्चा झाली.
दरम्यान, शहर कार्यकारणी यांच्यातील प्रमुख पदे वगळता इतर पदं बरखास्त करण्यात आली आणि प्रभारी नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या. येत्या एक महिन्याच्या आत पुणे शहरातील संपूर्ण कार्यकारणी बरखास्त तर केली जाणार असून नवीन कार्यकारणी लवकरच घोषित होईल अशी माहिती आहे. त्यामुळे "जुनी खोडं" बाजूला करत किती नवीन चेहऱ्यांना त्यामध्ये संधी दिली जाणार का याकडे लक्ष आहे.
निवडणुकीदरम्यान पक्षाशी गद्दारी?
पुणे महापालिका निवडणुकी दरम्यान पक्षातील पदाधिकाऱ्यांनी विरोधकांचा प्रचार केल्याचा धक्कादायक आरोप पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या संबंधित एक तक्रारीचे पत्र उद्योग मंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पाठवलं गेलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज पुणे शहरात झालेल्या बैठकीदरम्यान या पत्राची मोठी चर्चा रंगली होती. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या पुणे महापालिका निवडणुकीच्या काळात शहरातील २ पदाधिकाऱ्यांनी पक्ष विरोधी कामं करत पक्षाच्या विरोधात कुरघोडी करणे तसेच विरोधकांना मदत केली असल्याचा आरोप या पत्रामध्ये करण्यात आला आहे. या पत्रामुळे पक्षात एकच खळबळ उडाली असून संबंधित पदाधिकाऱ्यांवर काही कारवाई पक्षाकडून केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.