Saamana Editorial Today : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) नावासह धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) भाजपसह शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला. 'कोणी कितीही कट-कारस्थाने केली, बेइमानीचे घाव घातले तरी शिवसेना संपणार नाही. ती पुन्हा जन्म घेईल, झेपावेल, उसळेल, दुष्मनांच्या नरडीचा घोट घेईल', असा इशारा सामनातून देण्यात आलाय. (Shivsena News Today)
'शिवसेना' नावाचा अंगार निर्माण करणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज ज्या वेदना, दुःख होत असेल त्याचे काय? हे पाप ज्यांनी केले आहे ते शिंदे आणि त्यांचे चाळीस गारदी बाळासाहेब ठाकरे यांच्या शापाने कायमचे मातीमोल होतील. अशी घणाघाती टीका सामनातून करण्यात आली आहे.
'निवडणूक आयोगाने आता शिवसेनेचे 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवले आणि 'शिवसेना' हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा अंतरिम आदेश काढला. दिल्लीने हे पाप केले बेइमान गारद्यांनी आईशीच बेइमानी केली! आम्ही शेवटी इतकेच सांगतो, कितीही संकटे येऊ द्या, त्यांच्या छाताडावर पाय देऊन आम्ही उभे राहूच', असंही सामनाच्या अग्रलेखातून ठामपणे सांगण्यात आलं आहे. (Maharashtra News)
'एकनाथ शिंदे हे गारद्यांचे सरदार'
शिवसेनेस संपवणे कुणालाच जमले नाही, तेव्हा एकनाथ शिंदे या गारद्याची नेमणूक त्याकामी झाली. तैमूरलंग, चंगेजखान आणि औरंगजेब यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे आणि इतर गारद्यांनी दुष्टपणा केला. एकनाथ शिंदे हे गारद्यांचे सरदार आहेत. असा दानव हिंदुस्थानच्या इतिहासात पाच हजार वर्षांत झाला नसेल. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करताच त्याने दुष्टकर्मा अफझलखानाप्रमाणे दाढीवर ताव मारीत विकट हास्य केले असेल. अशी टीकाही सामनातून करण्यात आली.
'शिवसेनेला जमीन दाखवू असे अमित शहा सांगत होते'
भारतीय जनता पक्ष या सगळय़ाचा सूत्रधार आहे. शिवसेना फोडण्यासाठी आम्ही अडीच वर्षांपासून प्रयत्न करीत होतो, एकनाथ शिंदे यांच्यामुळे अखेर यश मिळाले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवसेनेला जमीन दाखवू असे अमित शहा सांगत होते. शिवसेना राहिलीच नाही असे फडणवीस यांनी जाहीर केले. या सगळय़ांना शिवसेनेशी मैदानात लढता येत नव्हते म्हणून त्यांनी न्यायालयात आणि निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेच्या पाठीवर गोळी झाडली, असा आरोपही सामनातून भाजपवर करण्यात आलाय.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.