Sanjay Raut Latest News : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बुधवारी दिवसभरात राऊतांना धमकीचे दोन फोन आले. राऊतांना फोनवरून धमकी मिळाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. (Maharashtra News)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरून वाद सुरू आहे. महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात हल्ला झाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं. बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पत्रकारपरिषद घेत महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरन शिंदे गटावर टीका केली होती. राज्यातील शिंदे सरकार हे नामर्दाचं सरकार असल्याचं संजय राऊत म्हणाले होते.
दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्रकारपरिषदेनंतर शिंदे गटाचे नेते शंभुराजे देसाई (shambhuraj desai) यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून शंभूराज यांनी राऊतांवर हल्लाबोल केला होता. संजय राऊतांनी आपलं तोंड आवरावं, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला होता.
संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणं थांबवावं, नाहीतर त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं देखील शंभूराजे यांनी म्हटलं होतं. या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
संजय राऊतांना धमकी कुणी दिली?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना काल दिवसभरात जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले. हे धमकीचे फोन कन्नड रक्षण वेदिकेकडून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे शिंदे गटातील नेते शंभुराजे देसाई यांनी संजय राऊतांना धमकीचे फोन आले हे सांगायला 24 तास का लागले? असा सवाल उपस्थित केला आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.