मयुर राणे, ता. ५ सप्टेंबर
Sanjay Raut On Jaydeep Apte Arrest: छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार झालेला शिल्पकार जयदीप आपटेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. काल रात्री उशिरा कल्याणमध्ये आई आणि पत्नीची भेट घ्यायला आला असता पोलिसांनी आपटेच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईनंतर आज जयदीप आपटेला न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र आपटेला अटक होण्याआधीच त्याच्या जामीनाची तयारी झाली आहे, असा दावा करत संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
"जयदीप आपटे सारखा एक माणूस वारंवार पोलिसांना चुकवत होता. अखेर शिवभक्तांचा एवढा दबाव की त्याला त्याचे बॉस वाचवू शकले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात या राज्याचे घडले ते यापूर्वी कधीच घडले नाही. जयदीप आपटे यांना अनुभव नसताना हे बेकायदेशीर आहे, ज्यांनी काम दिलं ते ते सूत्रधार आजही सरकारमध्ये आहेत, त्यांच्यावर कारवाई कधी होणार? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. जयदीप आवटे यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामीनाची तयारी आठ दिवसापासून सुरू होती आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र घालतात," असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.
"मी वारंवार ठाण्याच्या उल्लेख केला. जयदीप आपटे दोन दिवसात सरेंडर होतील त्यांना ताबडतोब जामिनाची येण्याची व्यवस्था करा अशा प्रकारचे सूत्र हालतात. जी मदत लागते ते सुद्धा ठाण्यातून मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा बाजार मांडला आणि केला त्या सगळ्याच जे षडयंत्र आहे त्याचे सर्व सूत्रधार ठाण्यातच आहेत," असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर संजय राऊत यांनी तोफ डागली.
"काल आम्ही राज्याच्या दौऱ्यावर होतो. आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मी स्वतः आणि आमचे अनेक पदाधिकारी फिरत होतो. अवस्था खूप गंभीर आहे दुष्काळात सर्व काही वाहून गेले आहे अजून सरकारने पंचनामा केलेला नाही. अनेक रस्ते वाहून गेले आहेत, दुर्दैव असा आहे गुजराती ठेकेदारांनी केलेली काम आहेत. महाराष्ट्रात इंजिनियर्स नाहीत का?" असे म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला.
तसेच "आदित्य ठाकरे येणार आहेत हे कळल्यावर राज्याचे कृषिमंत्री गेले ते गाडीतून उतरले सुद्धा नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी पायही जमिनीला लावला नाही, उलट कृषी मंत्री यांच्याकडे काही मागण्या करायला गेले तर शेतकरी यांच्या अंगावर कृषी मंत्री ओरडत राहिले मी काय करू मी तुमच्या शेतातील काम करू का?" असे म्हणाल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.