नागपूर हिट अँड रन प्रकरणावरून राजकारण आता चांगलेच तापले आहे. तीन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये भरधाव ऑडी कारने तीन वाहनांना धडक दिली होती. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले होते. ही कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेची आहे. या प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. आता सामनातून याच मुद्द्यावरून चंद्रशेखेर बावनकुळे यांच्यासह भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. संकेत बावनकुळे हे सरकारचे लाडके सुपुत्र असून त्यांच्या नावाने मिंधे-फडणवीस सरकारने लाडक्या पोरांच्या नावाने 'चिरडा व पळा' योजना सुरू करून हिट अँण्ड रनमधील सर्व गुन्हगारांना माफी द्यायला हवी, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.
सामनाच्या अग्रलेखात असे लिहिले आहे की, 'नागपूरच्या ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणातील मुख्य आरोपींना ज्याप्रकारे वाचवले जात आहे ते पाहता राज्यात कायद्याचे राज्य राहिलेले नाही हे स्पष्ट दिसते. नागपूरचे प्रकरण साधे नाही. बडे बाप के बेटे दारूच्या नशेत महागड्या गाड्या भरमसाट वेगाने चालवतात आणि रस्त्यावरील वाहने, माणसे यांना किड्या-मुंग्यांसारखे चिरडून फरार होतात. पुढे मग सागर बंगल्यावरील त्यांचे बॉस अशा गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न करतात. रस्त्यावर माणसे तडफडून मरतात. त्यांना मरू द्या. हा सध्याचा कायदा-सुव्यवस्थेचा ताळेबंद आहे.'
या अग्रलेखातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. 'संकेत बावनकुळे आणि त्यांच्या मित्रांनी नागपूरच्या ‘लाहोरी’ बारमध्ये दारू पार्टी केली आणि झोकांड्या देत ते गाडीत बसले. धरमपेठ भागात गेल्यावर गाडीवरील नियंत्रण सुटले आणि वाहनांना जोरदार धडका देत हे तीन नशेबाज पुढे गेले. या अपघातात १७-१८ जण गंभीर जखमी झाले. म्हणजे मानवी हत्या घडविण्याचाच हा गुन्हा मानायला हवा आणि गाडीतील त्या तिन्ही नशेबाजांना अटक करून पोलिसांनी कोठडीत डांबायला हवे होते, पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अपार कृपादृष्टीमुळे गुन्हा नोंदविण्यापासून साक्षी, जबान्या, तपासात, सर्वच पातळ्यांवर संकेत बावनकुळेला वाचविण्याचा प्रयत्न झाला.'
तसंच, ‘एफआयआर’ अशा पद्धतीने बनवला गेला की, नशेबाज आरोपी सुटायलाच हवेत. गाडीचे मालक स्वतः युवराज संकेत बावनकुळे, पण एफआयआरमध्ये तसा संदर्भच टाळला. गाडी कोण चालवत होते आणि अपघातानंतर गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर कुणास बसवले? हे सर्व उघड असताना त्या काळातले सीसीटीव्ही फुटेज गायब केले. संकेत बावनकुळे हे स्वतः नशेत धूत असताना त्यांचा वैद्यकीय रिपोर्ट दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. संकेत बावनकुळेच्या जागी दुसरा कोणी सामान्य इसम असता तर एव्हाना पोलिस, भाजपच्या फौजा एकत्र येऊन माकडाचा बैल करून मोकळे झाले असते. पण आता फडणवीसांच्या गृहखात्यासह संपूर्ण भाजप मौनात गेली आहे.', अशी टीका भाजपवर करण्यात आली आहे.
पुणे हिट अँड रन प्ररकरणात नेमकं काय झालं यावरून देखील त्यांनी सरकारवर निशाणा साधला.'महाराष्ट्राच्या ‘मिंधे’ सरकारात कायद्याची प्रतिष्ठा उरलेली नाही. गुन्हा करा आणि पैसे देऊन सुटा. नाही तर गुन्हा करून वर्षा किंवा सागर बंगल्यावर जाऊन स्वतःची सुटका करून घ्या. हे सर्रास चालले आहे. हे दोन्ही सरकारी बंगले म्हणजे अपराधी आणि भ्रष्टाचाऱ्यांचे अड्डेच बनले आहेत. ‘लाडके गुन्हेगार’ योजना सुरू करून सरकारने महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची वाट लावली आहे. पुण्यातील पोर्शे हिट अॅण्ड रन प्रकरणात गाडीचालक बदलला गेला. नशेबाजाचे रक्त बदलले गेले आणि शेवटी दोन निरपराध्यांचा बळी घेणाऱ्या अग्रवाल पुत्राला रस्ते सुरक्षेवर एक निबंध लिहिण्याची शिक्षा ठोठावून न्याय देवतेने कायद्याची व्याख्याच बदलली. त्यामुळे नागपूर प्रकरणातील संकेत बावनकुळे हे आतापासून निबंध लेखनाच्या सरावास लागले आहेत. नागपूरचे पोलिस आयुक्त या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात आहेत.', असे अग्रलेखात म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.