मुंबई : एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे ४० हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेपुढे (Shivsena) मोठं पक्षसंकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपुढे (Uddhav Thackeray) मोठा पेच निर्माण झाला आहे. शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर राज्यातील निवडणुकीत याचा काय परिणाम होईल यावर आधारित एक सर्व्हे साम टिव्ही आणि सकाळ माध्यमाने केला आहे. ( Saam Sakal Survey on Maharashtra Political Crisis )
एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील साऱ्यांचे लक्ष राजकीय घडामोडींकडे लागले आहे. त्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुवाहाटीत जाऊन तळ ठोकला आहे. त्यानंतर आज बंडखोर आमदारांनी राज्यात यावे, समोर बसून चर्चा करावी, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केली. 'कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका , शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही , समोर आलात बोललात तर मार्ग निघेल', असेही आवाहन ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केले. याचदरम्यान, एकनाथ शिंदे गटातील बंडवीरांना शिवसेनेचा पारंपारिक मतदार पुन्हा निवडूण देणार का? यावर तज्ञ्ज, सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी मत व्यक्त केलं आहे.
श्रीराम पवार म्हणाले, 'आम्ही घेतलेल्या सर्व्हेमध्ये सध्या शिवसैनिकांचा मोठा गट उद्धव ठाकरे आणि मूळ शिवसेनेसोबत आहे. मात्र, या सर्व्हेत शिवसेनेचा १२.५ टक्के पारंपारिक मतदार हा बंडखोर आमदारांना पुन्हा मतदान करण्यास तयार आहे. त्यामुळे शिवसेनेचा १२.५ टक्के मतदार हा हलल्याचे दिसत आहे. तर या सर्व्हेत ११.१ टक्के मतदारांनी बंडखोर आमदारांना पुन्हा मतदान करणार का ? यावर काही सांगता येणार नाही सांगितले. त्यामुळे एकंदरित २२.५ टक्के शिवसेनेचा पारंपारिक मतदार हलला आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. हा सर्व्हे जरी शिवसेनेसाठी सकारात्मक दिसत असला तरी आगामी निवडणुकीत मोठी उलथापालथ होऊ शकते.
एकंदरित २२.५ टक्के शिवसेनेचा पारंपारिक मतदार हा सेनेपुढे आव्हान आहे. त्याचबरोबर शिवसेनेचा १२.५ टक्के पारंपारिक मतदार हा एकनाथ शिंदे गटासोबत आहे. या सर्व्हेतील सर्व मतदार हे शिवसैनिक असून गेल्या निवडणुकीत शिवसेनेला मतदान करणारे मतदार आहेत. त्यातील २२.५ टक्के मतदारांच्या मनात संभ्रम आहे की, आगामी निवडणुकीत शिवसेनेला मतदान करायचे की नाही. त्यामुळे सर्व्हे शिवसेनेच्या बाजूने सकारात्मक दिसत असला तरी सेनेचा २२.५ टक्के पारंपारिक शिवसैनिक मतदार संभ्रम अवस्थेत आहे. त्यामुळे या मतदारांचे आव्हान शिवसेनेपुढे आहे. तसेच एकनाथ शिंदे गटाला केवळ १२.५ टक्के शिवसैनिकांची पुन्हा मतदान करण्याची तयारी आहे, त्यामुळे शिंदे गटापुढेही आव्हान आहे'.
दरम्यान, बंडखोर आमदारांना पुन्हा मतदान करणार का ? या सर्व्हेतून बंडखोरांना मतदान करणाऱ्यांची संख्या आणि निर्णयापर्यंत न पोहोचू शकणाऱ्या शिवसैनिकांची संख्या लक्षणीय आहे, असे दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.