लोकसभा निवडणुकीमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या उमेदवादांमध्ये आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी सुरु झाली आहे. या लोकसभा निवडणुकीमुळे दक्षिण-अहमदनगरमधील राजकारणही तापलं आहे. दक्षिण-अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना इंग्रजी बोलण्याचं आव्हान दिलं. सुजय विखेंनी आव्हान दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
रोहित पवार यांनी 'एक्स' सोशल मीडियावर पोस्ट करत खासदार सुजय विखेंना प्रत्युत्तर दिलं आहे. भाषा, शिक्षणाने कर्तृत्व सिद्ध होत नाही, अशा आशयाची पोस्ट करत आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
रोहित पवार यांची पोस्ट जशीच्या तशी
लोकप्रतिनिधीला इंग्रजी-हिंदी समजते की नाही हे महत्वाचं नसतं तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा, त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आणि जनतेची भाषा समजण्यात आम्ही दिलेले उमेदवार माहीर आहेत. नाहीतर इंग्रजी-हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणाऱ्या भाजप खासदारांची, प्रश्नांची उत्तरं न देता येणाऱ्या मंत्र्यांची संख्या काही कमी नाही. असो!
भाषा किंवा शिक्षण यावरुन कर्तृत्व सिद्ध होत नाही. टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी ही टीका केली असेल हे आम्ही समजू शकतो.. पण याच अविर्भावात तुमच्या ‘सर्वोच्च’ नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर तुमचेच बारा वाजतील!
नगरमधील मेळाव्याच्या सुरुवातीला सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडिओचा आधार घेत सुजय विखे यांनी निलेश लंके यांना आव्हान दिलं. 'मी जेवढी इंग्रजी बोललो आहे, तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं आव्हान सुजय विखे यांनी निलेश लंके यांना दिलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.