
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली. या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातायत. ऑगस्ट मध्ये सुरू झालेल्या योजनेनुसार पात्र महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा होताना दिसतात. शनिवारी झालेल्या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने सुद्धा मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणीचे आभार मानले आणि ही योजना पुढील ५ वर्ष सुरू राहील अशी ग्वाही सुद्धा दिली. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेतील रक्कम १५०० वरून ३००० सुद्धा केली जाईल पण त्याची योग्य वेळ येईल असे आश्वासन सुद्धा दिले. आता ती योग्य वेळ कधी येईल हे वेळच सांगेल पण तत्पूर्वी स्थानिक लाडक्या बहिणींची मनं जिंकण्यासाठी त्यांचे "भाऊ" सुद्धा तयार झाले आहेत हे ही तितकंच खरं.
पुण्यात एका "भाऊ" ने स्थानिक महिलांसाठी चक्क चांदी च वाटली. निमित्त होतं रक्षा बंधन या सोहळ्याचे. आता राज्याचे मंत्री लाडक्या बहिणींसाठी अनेक वेळा विविध आश्वासनं देताना दिसतात मग स्थानिक पातळीवर कार्यकर्ता कसा मागे राहील. पुण्यातील या कार्यकर्त्याचे नाव आहे निलेश शिंदे आणि हा शहरातील दुसऱ्या तिसऱ्या भागातील नसून चक्क कोथरूड चा आहे!
रक्षा बंधनाच्या निमित्ताने राज्यातील विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते विविध उपक्रम घेताना दिसतात पण पुण्यातील कोथरूड भागातील या उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सणासुदीच्या निमित्ताने पुण्यातील अनेक महिलांच्या खात्यात लाडकीच्या योजनेचे पैसे जमा असतील किंवा नसतील पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलेश शिंदे यांनी बहिणींच्या खात्यात थोडा हातभार लावला आहे.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर निलेश शिंदे आणि त्यांची पत्नी तृप्ती यांनी कोथरूड परिसरातील महिलांना चांदीची वस्तू भेट देण्याचा एक अनोखा उपक्रम राबवला. आता भेट वस्तू मिळणार म्हटल्यावर कोथरूड मधील सुतारदरा, जयभवानीनगर या ठिकाणच्या महिलांनी सकाळी दहा वाजल्यापासून शिंदे यांच्या कार्यालयाजवळ गर्दी केली. यावेळी महिलांनी शिंदेंना राखी बांधली आणि भावाकडून चांदीची भेट वस्तू नेली. या अनोख्या उपक्रमात शिंदे दांपत्याने तब्बल ३५०० महिलांना चांदीमध्ये घडवलेल्या देवाच्या प्रतिमा भेट म्हणून देण्यात आल्या.
या उपक्रमाच्या बाबत विचारले असता, निलेश शिंदे म्हणाले, "निलेश शिंदे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काम करतो. कोथरूड भागातील नागरिकांचे विविध प्रश्न आहेत. ते सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सदैव्य उपस्थित आहोत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यात निधी जमा झाला आहे. एक छोटा भाऊ म्हणून, कर्तव्य भावनेतून, प्रभागातील सर्व बहिणींना एक भेट देत आहोत. फक्त ही भेट नाही तर येत्या काळात महिला सुरक्षेला प्राधान्य देत परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कटिबद्ध आहोत."
गेल्या महिन्यात पुण्यातील धानोरी परिसरातील एका दांपत्याने गटारी निमित्त स्थानिक परिसरात तब्बल ३००० किलो चिकन मोफत दिलं होतं. आता कोथरूडच्या या दांपत्याने थेट महिलांना चांदीची भेट वस्तू दिली आहे. काही महिन्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे रणशिंग फुंकले जातील पण याची पूर्व तयारी सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झाल्या नाहीत पण एक मात्र नक्की आपल्या भागातील "लाडक्या बहिणींची मनं जिंकण्यासाठी" आता प्रत्येक "भाऊ" नव नवीन शक्कल लढवतो आहे हे ही तितकंच खरं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.