मुंबई : सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. शिवरायांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी उद्विग्न झाले आहेत. हा पुतळा कोसळण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याच मालवणमधील घटनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला होता. पुतळा उभारल्यानंतर अवघ्या ८ महिन्यातच कोसळल्याची घटना घडली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं आहे. तसेच यानंतर त्यांनी शिवप्रेमी म्हणून संपूर्ण राज्यभरात आंदोलन करणार आहोत, अशी भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस नेत्यांनाही या घटनेवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. तर सुप्रिया सुळे यांनी पुतळा बनवणाऱ्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. आता याच घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'एक्स'वर सणसणीत पोस्ट लिहिली आहे.
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, 'मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्र राज्याचा आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला होता, असा पुतळा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
' आजच्या मालवणमधील घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील 'पाच पुतळ्यांवरची' कविता आठवली. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दामून देत आहे. मध्यरात्र उलटल्यावर, शहरातील पाच पुतळे, एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले , मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले ,मी फक्त बौद्धांचा.टिळक उद़्गारले ,मी तर फक्त, चित्पावन ब्राम्हणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि ते म्हणाले , तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठिशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती, असे राज ठाकरे म्हणाले.
'पुतळे, स्मारके ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे. ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उद्धस्त केली पाहिजे. तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.