
मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान आज सकाळी लोकल अपघाताची भयंकर घटना घडली. या अपघातामध्ये ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. या अपघातानंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या अपघातावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. 'बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे राज्यात बोजवारा उडाला आहे. कोण कुठून येतंय, काय करतंय हे पाहावं लागेल. अपघात होत नाही असा एकही दिवस नाही.', असे मत राज ठाकरे यांनी मांडले.
पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'बाहेरून येणाऱ्या लोंढ्यामुळे राज्यात बोजवारा उडाला आहे. आपघात होत नाही, असा एक दिवस जात नाही. विषय रेल्वे पुरता नाही, शहराचा विचका उडाला आहे. मेट्रो आणि मोनो रेल्वेने समस्या सुटणार नाहीत. शहराच्या समस्येकडे कुणीही पाहत नाही. मुंबईतील गर्दी नवीन नाही. रेल्वे मंत्री काय करतात? त्यांनी संध्याकाळी रेल्वेचे फलाट पाहून प्रवास करून दाखवावा.'
राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, 'सगळे निवडणुकांमध्ये गुंतले. शहरांच्या समस्यांकडे कुणी बघत नाही. रेल्वे, ट्राफिक, पार्किंगचा बोजवारा उडाला. अपघात होत नाही असा एकही दिवस नाही. रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा देऊ नये परिस्थिती जाऊन बघावी. रेल्वेचा प्रवास मी देखील पाहिला आहे. मुंब्र्यातील धोकादायक वळण नवीन नाही. प्लॅटफॉर्मवरची गर्दी बघा लोक कसे लोकलमध्ये शिरतात ते बघा. लोकलला दरवाजे लावल्यास लोक गुदमरून मरतील.'
तसंच, 'महाराष्ट्रातील शहरांची अवस्था खूपच बिकट आहे. शहरांचे विद्रुपीकरण झाले आहे. प्रवासी फूटबोर्डवरून प्रवास करत होते. आपल्या देशात माणसांची किंमत नाही. विषय रेल्वेपूरता नाही शहरांचा विचका झालाय. आग लागली तर बंबही जाऊ शकत नाहीत. कोण येतंय कोण जातंय ?काही माहिती नाही. कोण कुठून येतात काय करतात? काही माहिती नाही. रेल्वे मंत्र्यांनी परिस्थिती सुधरवावी. रेल्वेच्या दुर्घटनेकडे सरकारने तातडीने लक्ष द्यायला हवं. लोकलची संख्या वाढवा अन्यथा आंदोलन करू.', असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.