पुण्यात रिमझिम पावसात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत झाले.
मानाचे पाच गणपतींसह दगडूशेठ आणि मंडई मंडळाने जल्लोषात आगमन मिरवणूक काढली.
घरगुती बाप्पांसाठी पुणेकरांनी शाडूच्या मातीच्या इको-फ्रेंडली मूर्तींना पसंती दिली.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या घरीसुद्धा बाप्पाचे विधिवत स्वागत करण्यात आले.
अक्षय बडवे, साम टिव्ही प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुण्यात उत्साहाचा माहोल पाहायला मिळाला. रिमझिम पाऊस, ढोल-ताशांचा गजर आणि रोषणाईच्या झगमगाटात सार्वजनिक गणेश मंडळांसह घराघरांत बाप्पांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अनेकांनी आकर्षक देखावे, विद्युत रोषणाई आणि मखरांची सजावट करून घरगुती गणपतींचं स्वागत केलं. यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना पुणेकरांची विशेष पसंती दिसली.
मानाचे पाच आणि इतर प्रमुख गणेश मंडळांच्या आगमन मिरवणुका
पुण्यातील मानाचे पाच गणपती मंडळ म्हणजेच कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग मंडळ आणि केसरीवाडा गणेशोत्सव यांच्यासह शहरातील प्रमुख आकर्षण असलेले श्रीमंत दगडूशेठ गणपती आणि मंडई मंडळाकडून गणरायाची जल्लोषात आगमन मिरवणूक काढत उत्साहात स्वागत केले. सकाळी ८ वाजता श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मुख्य मंदिरात आरती झाल्यावर आकर्षक फुलांच्या रथातून मिरवणूक काढत तिथून जवळच असलेल्या उत्सव मंडपात विराजमान करण्यात आली. सकाळी ११ वाजता बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होताच भाविकांसाठी दर्शन खुलं करण्यात आलं.
मानाचा पहिला गणपती पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची आगमन मिरवणूक सकाळी १० वाजता पारंपरिक वाद्य यांच्या गजरात झाली आणि ११ वाजून ३७ मिन. वाजता बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी (१२.१५ वाजता) यासह तिसरा मानाचा गणपती गुरुजी तालीम (२.३० वाजता) आणि मानाचा चौथा तुळशीबाग गणपती (१२.१५ वाजता) यांनी बाप्पाचे स्वागत जल्लोषात केले. मानाचा पाचवा केसरीवाडा याठिकाणी सुद्धा नियोजित वेळेत बाप्पाची पूजा, आरती करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अखिल मंडई मंडळाकडून सुद्धा आगमन सोहळ्यासाठी फुलांचा आकर्षक रथ तयार करण्यात आला होता. विलोभनीय शारदा गजाननाची मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा दुपारी १२ वाजता करण्यात आली.
इको फ्रेंडली घरगुती गणपतींना पुणेकरांची पसंती
सार्वजनिक गणेश मंडळांसह पुणे शहरातील सर्व भागात घरोघरी देखील बाप्पांचे स्वागत करण्यात आले. छोटे मंदिरं, मखर, विद्युत रोषणाई यासह विविध प्रकारची सजावट घरोघरी करण्यात आली होती. पुणेकरांनी यंदा इको फ्रेंडली गणपती मूर्तींना पसंती दिल्याचं पाहायला मिळालं. तसेच पी ओ पी मूर्ती न खरेदी करता नागरिकांनी शाडू माती अनेक स्टॉल वरून खरेदी केली.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या घरी बाप्पा विराजमान
गणेशोत्सवाला आज सुरुवात झाली आहे आणि त्या निमित्ताने विविध मान्यवरांच्या घरी लाडक्या घड्याळाचा आगमन अगदी थाटामाटात झालं. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या घरी बाप्पाचे स्वागत करून विधिवद पूजा करण्यात आली. गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते महापौर आणि तिथून खासदार आणि नंतर केंद्रीय मंत्रीपद हे सगळं मिळण्यात कायमच बाप्पाचे आशीर्वाद मिळाले असल्याची भावना यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली. पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांच्या समवेत त्यांनी बाप्पाची पूजा आणि आरती केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.