
विरार पूर्वेतील रमाबाई अपार्टमेंटची चार मजली इमारत कोसळली.
एका वर्षाच्या चिमुकलीचा वाढदिवस सुरू असताना दुर्घटना घडली.
आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू, तर २० ते २५ जण अडकल्याची शक्यता.
अग्निशमन दल आणि NDRF पथक बचावकार्य सुरू ठेवत आहेत.
बुधवारी रात्री जोईल कुटुंबात आनंदाचं वातावरण. चिमुकलीचा पहिला वाढदिवस. एकीकडे मुलीचा पहिल्या वाढदिवसाची धामधूम तर, दुसरीकडे राज्यात गणेश आगमनासाठी लोकांची जोरदार तयारी. मात्र विरार पूर्व भागात बुधवारी रात्रीच्या सुमारास काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. क्षणात चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या अपघातात जोईल कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. तर, २० ते २५ जण मलब्याखाली अडकल्याची भीती आहे.
विरार पूर्व भागातील नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंटचा एक भाग कोसळला. इमारत कोसळण्यापूर्वी चौथ्या मजल्यावर एका वर्षाच्या चिमुकलीचा बर्थ डे सुरू होता. घरामध्ये पाहुणे रावळेंची गर्दी होती. मात्र, इमारत कोसळल्यानं क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अनेकांचा संसार उघड्यावर पडला. या अपघातात ओमकार जोईल (वय वर्ष २५), आरोही ओमकार जोईल (वय वर्ष २३), उत्कर्षा ओमकार जोईल (वय वर्ष १) तिघांचा मृत्यू झाला. चिमुकलीसाठी पहिला वाढदिवस शेवटचा ठरला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रमाबाई अपार्टमेंटची चार मजली इमारत कोसळल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. शेजारी असणाऱ्या विंगमधील नागरिक तातडीने खाली उतरले. अग्निशमन दल, पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक यासह स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. दुसऱ्या इमारतीतील रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. सध्या बचाव पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तसेच संताप व्यक्त केला आहे.
ढिगाऱ्याखाली २० ते २५ जण अडकले असून, ५ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी इमारतीला सील केलंय. परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.