
सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी एक हजार बस पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) ताफ्यात येणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडुन (पीएमआरडीए) ५०० बस घेण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका मिळून जवळपास ५०० बस उपलब्ध केल्या जाणार आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) ताफ्यात असलेल्या अपुऱ्या बस संख्येमुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर एकीकडे ताण वाढत आहे. पुण्यात खासगी वाहनांचा वापर वाढत असल्याने वाहतुक कोंडीची समस्या वाढत आहे. या पार्श्वभुमीवर, राज्य सरकारकडुन पुणे व पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
पालकमंत्री अजित पवार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही "पीएमपीएल'साठी नवीन बस खरेदी करण्याबाबत सुतोवाच केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईमध्ये बैठक झाली. या बैठकीस पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी उपस्थित होते. या बैठकीमध्ये बस घेण्यास मान्यता देण्यात आली.
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांकरीता सीएनजीवर चालणाऱ्या एक हजार बस घेतल्या जाणार आहेत. त्यापैकी "पीएमआरडीए' ५०० बस पीएमपीएलला देण्याबाबतचा निर्णय मुख्यमं त्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, पीएमआरडीएच्या अंदाजपत्रकामध्ये त्यासाठी तरतुद करण्यात आली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या घेतलेल्या बैठकीत पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिकेने ५०० बस उपलब्ध करुन देण्यास सांगितले होते.
पुणे महापालिकेकडुन खरेदी केल्या जाणाऱ्या बससाठी ४० ते ४५ कोटी रुपयांची आवश्यकता लागणार आहे. सध्या पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमधील प्रवाशांची संख्या लक्षात घेता, ६००० बसची गरज आहे, प्रत्यक्षात रस्त्यावर १६५० बस धावतात. आयुर्मान संपल्यामुळे ३०० बस कमी होणार आहे. त्यामुळे बस खरेदीच्या मान्यतेमुळे पीएमपीएलला उर्जितावस्था येण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये बुधवारी झालेल्या बैठकीत पीएमआरडीएकडुन पाचशे बस पीएमपीएलला द्याव्यात, असा निर्णय घेण्यात आला. तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांनी पाचशे बसेस द्यावेत असे आदेश दिलेले आहेत. यानुसार १ हजार बस घेतल्या जाणार आहेत अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.