Meena Prabhu : ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू यांचं निधन; साहित्य क्षेत्रावर शोककळा
Meena Prabhu News : जेष्ठ लेखिका डॉ. मीना सुधाकर प्रभू याचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८५ वयाच्या होत्या. मीना प्रभू यांनी जगातल्या अनेक देशांमध्ये प्रवास करुन प्रवासवर्णने लिहिली होती. त्यांचे अनेक लेख मराठी वर्तमानपत्रे, नियतकालिके यांमध्ये प्रकाशित झाले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील काम सुरू असताना त्यांनी मराठीत प्रवासवर्णनपर लेखनास सुरुवात केली होती.
२७ ऑगस्ट १९३९ रोजी पुणे येथे मीना सुधाकर प्रभू यांचा जन्म झाला. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी संपादन केल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी मुंबईत घेतले. विवाहानंतर त्या इंग्लंडला गेल्या. तेथे त्यांनी अनेक वर्षे भूलतज्ज्ञ आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणून रुग्णसेवा केली. त्याचदरम्यान त्यांनी मराठीमध्ये प्रवासवर्णनपर लेखनास सुरुवात केली. पुढे त्यांनी कादंबरी लेखन केले. त्यांचे कवितासंग्रहही प्रकाशित झाले.
विविध देशांमधील संस्कृती, समाजव्यवस्था, राहणीमान, तेथील नागरिकांची स्वभाववैशिष्ट्ये आणि त्या देशाचे ऐतिहासिक कंगोरे सहज सोप्या आणि ओघवत्या शैलीत मांडण्याची त्यांची हातोटी होती. रंजक वर्णने आणि एका सर्वसामान्य स्त्रीच्या भूमिकेतून अनुभवलेले विविध प्रसंग त्यांनी मांडल्याने या लेखनातून वाचकांना जणू प्रत्यक्ष तो देश फिरून आल्याची प्रचिती मिळाली.
माझं लंडन हे त्यांचे पहिले पुस्तक. या पुस्तकाच्या सात आवृत्त्या प्रकाशित झाल्या. दृष्टिहीन बांधवांसाठी हे पुस्तक ब्रेल लिपीमध्येही प्रकाशित करण्यात आले. त्यांचा शरद पवार यांच्या हस्ते कुकरी हे मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला होता. पहिल्याच पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादानंतर प्रभू यांच्या लेखनाला प्रोत्साहन मिळाले. मीना प्रभू यांची चिनी माती, गाथा इराणी, तुर्कनामा, इजिप्तायन अशी अनेक पुस्तके वाचनांच्या पसंतीस पडली.
गोवा येथे झालेल्या महिला साहित्य संमेलनाच्या मीना प्रभू अध्यक्ष होत्या. प्रदीर्घ साहित्यसेवेची दखल घेऊन प्रभू यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार, न. चिं. केळकर पुरस्कार पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. गेल्याच वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेने मसाप जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.