
पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोरजवळ झालेल्या एका भीषण अपघातामध्ये एका ३१ वर्षीय विद्यार्थ्याचे निधन झाले आहे. हा तरुण पुण्यातील स्व-रूपवर्धिनी संस्थेमध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता. दुचाकी रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला. दुचाकीवर मागे बसलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला दुखापत झाली. मित्राच्या लग्नाच्या समारंभातून परतत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
समाधान संभाजी भिटे असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील नीर निंबगाव येथील रहिवासी होता. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान भिटे आणि पीएसआय मयूर डोंगरे पुण्यातील मंगळवार पेठ परिसरात राहत होता. भिटे हे स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. शुक्रवारी (९ मे) रोजी मित्राच्या हळदी समारंभासाठी ते दोघे लोणी काळभोर येथे गेले होते.
हळदी समारंभावरुन परतत असताना पुणे-सोलापूर महामार्गावरुन कवडीपाट परिसरात जात असताना दुचाकीचे नियंत्रण गेल्याने अपघात झाला. दुचाकीने वेगाने दुभाजकाला धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
स्थानिकांच्या मदतीने समाधान भिटे आणि मयूर डोंगरे यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. दोघांवरही उपचार सुरु करण्यात आले. शनिवारी १० मे रोजी समाधान समाधान भिटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भिटे यांच्या कुटुंबाने मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. शोकाकुल वातावरणात मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.