पुण्यातील अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्थेच्या (Ambarchandji Munot Education Institute) संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. शिक्षकांच्या वेतनातून २५ हजार रुपये कपात केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३५ वर्षीय शिक्षकाने त्यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (Bharati Vidhyapith Police Station) तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्थेच्या ५ संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
सेवानिवृत्त होईपर्यंत दरमहा वेतनातून १० टक्के रक्कम संस्थेस देण्याची मागणी करून शिक्षकांच्या वेतनातून २५ हजार रुपये कपात केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. या प्रकरणी कात्रजमधील स्व. अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्थेच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका ३५ वर्षीय शिक्षकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्व. अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्थेचे संचालक अशोकलाल अंबरचंद मुनोत, निखिल अशोकलाल मुनोत, उल्का शशिकांत नवगिरे, सुरेखा महादेव सुतार, हर्षदा अशोकलाल मुनोत अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ८ मार्च २०२३ पासून सुरू होता. आरोपींनी फिर्यादी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासकीय अनुदानाची फाइल शिक्षण विभागाकडे पाठविण्यासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते. तसंच, सेवानिवृत्त होईपर्यंत दरमहा वेतनातून १० टक्के रक्कम संस्थेस द्यावी लागेल, असे सांगितले होते.
गुन्हा दाखल झालेल्या संचालकांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून रोख आणि ऑनलाइन पद्धतीने प्रत्येकी २५ हजार रुपये घेतले. तसेच, वेतनातून १० टक्के रक्कमेची वेळोवेळी मागणी केली. फिर्यादी शिक्षकाने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी दिली. तसंच इतर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळ केला, असे आरोप फिर्यादीने तक्रारीमध्ये केले आहे. सध्या याप्रकरणाचा तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.