पुणे तिथे काय उणे असे नेहमीच म्हटले जाते. पुण्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे राडे सुरूच आहेत. कधी शुल्लक कारणावरून, कधी बघण्यावरून, कधी पार्किंगवरून तर कधी धक्का लागल्यामुळे भांडणं होत असतात. ही भांडणं छोटी-मोठी नसतात तर थेट हाणामारीच होते. अशामध्ये आता पुण्यामध्ये कुत्र्यामुळे तुफान राडा झाला आहे. तुमचा कुत्रा आमच्या श्वानाला चावला, यावरून पुण्यात भल्यापहाटे दोन मालक एकमेकांमध्ये भिडले. यांच्या वादामुळे शेजारी राहणाऱ्यांना प्रचंड त्रास झाला. त्यामुळे या नागरिकांनी संताप व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मगरपट्टा परिसरात ही घटना घडली आहे. अमेरिकन पिटबुल या श्वानाच्या जातीने दुसऱ्या श्वानावर हल्ला केला. त्यामुळे या दोन्ही श्वानाच्या मालकांमध्ये तुफान राडा झाला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या संदर्भात हडपसर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुत्र्यावरून झालेला वाद थेट पोलिस स्टेशनपर्यंत पोहचला.
दोन्ही श्वान मालकामध्ये हल्ल्यावरून वाद झाला. घातक श्वानाच्या प्रजातीळे मगरपट्टा परिसरातील रहिवासी संतप्त झाले आहेत. पिटबुलला बंदी असतानाही अशा घातक श्वानांच्या जाती अनेक लोक पाळतात. त्यामुळे पिटबुल हल्ला करू शकतात याची नागरिकांना भीती आहे. मगरपट्ट्यातील बाबुळ गार्डन येथील एका बंगल्यात असणाऱ्या श्वान मालकाबरोबर शेजारच्या वाद झाला. अमेरिकन पिटबुल नावाचा श्वान दुसऱ्या श्वानाला चावल्याने शेजारील नागरिकांनी श्वान मालकाच्या घरात जाऊन विचारपूस केली. यावेळी पिटबुल श्वानाच्या घरातील महिलांनी आरडाओरडा करत वाद घातला.
श्वानामुळे झालेला हा संपूर्ण वाद सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीत पिटबुल दिसत आहे. या संदर्भात हडपसर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मगरपट्टा परिसरात आम्ही आमच्या घरात सुरक्षित नाही कारण असे पाळीव प्राणी आणि त्याचे मालक यांचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो, असे तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये म्हटले आहे. श्वानांच्या घातक जातीमध्ये पिटबुल ही प्रजाती येते. सध्या भारतामध्ये श्वानांच्या काही घातक प्रजातींना बंदी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.