अक्षय बडवे, साम टीव्ही
मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी मुलाचा खाणीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना पुणे शहरातील वारजे रामनगर परिसरात घडली. दक्ष सुशांत कांबळे (वय १३) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यदिनी शाळेतील झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दक्ष आणि त्याचे मित्र वारजे (Pune News) भागातील रामनगर परिसरात असलेल्या एका खाणीत पोहण्यासाठी गेले होते. यावेळी काही मुलांनी पोहण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या.
दक्ष हा देखील मित्रांच्या मदतीने पाण्यात उतरला. पण त्याला पोहता येत नसल्याने तो बुडाला. दक्ष बुडू लागल्यानंतर त्याच्यासोबतची मुले घाबरून गेली. त्यांनी याबाबतची माहिती कोणालाही सांगितली नाही. तसेच घटनास्थळावरून देखील पळ काढला.
दरम्यान, सायंकाळपर्यंत दक्ष घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध करून त्याच्या मित्रांकडे चौकशी केली. यावेळी दक्ष हा खाणीत पोहायला गेल्यावर पाण्यात बुडाल्याची माहिती एका मुलाने दिली.
मुलगा पाण्यात बुडाल्याचं कळताच आई-वडिलांच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यांनी आरडाओरड करत खाणीच्या दिशेने धाव घेतली. स्थानिकांनी या घटनेची माहिती वारजे माळवाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांसह जवळपास दोन तास बोटीच्या माध्यमातून शोधकार्य केले.
रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास खाणीतल्या पाण्यात दक्षचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. दक्ष हा शिवणे येथील नवभारत हायस्कूल या शाळेमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकत होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.