अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी
Pune Latest News Update : पुणे शहरातील लोहगाव खराडी या दोन्ही परिसरांना जोडणारा अवघ्या तीनशे मीटरचा रस्ता पूर्णपणे खचलाय. या रस्त्याचे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अमरण उपोषणाचा पवित्रा घेतलाय तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांनी. आज सकाळी दहा वाजल्यापासून बापू पठारे हे त्यांचे काही कार्यकर्ते आणि स्थानिकांसोबत या तीनशे मीटर रस्त्याजवळ आंदोलनाला बसले आहेत. या रस्त्याबाबत तक्रार करायला गेलं की या विभागाचे अधिकारी बघू, करू असं म्हणतात पण आता जोपर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण होत नाही, तोपर्यंत मी असाच बसून राहणार असा पावित्र्य पठारे यांनी घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर जवळ असलेल्या एका सातशे मीटरच्या रस्त्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सुप्रिया सुळे यांनी अमरण उपोषण केलं तेव्हा देखील इतक्या लहान रस्त्याचे काम का होत नाहीत असा प्रश्न अनेकांना पडला होता. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांचे उपोषण मागे घेतलं.
आता पुणे शहरातच रस्त्यांचे काम तसंच रस्त्यांची दुर्दशा पुणेकरांसाठी काही नवीन नाही. पुण्यातील विस्तारित भाग म्हणून ओळख असलेल्या लोहगाव खराडी भागात एक रस्ता आहे जो या दोन्ही भागांना जोडला जातो. यातील काही रस्ता सुस्थितीत असून 300 मीटरचा रस्ता मात्र पूर्णपणे उखाडलेला आहे. याच तीनशे मीटर रस्त्यासाठी पुणे शहरातील महाविकास आघाडीचे एकमेव आमदार बापू पठारे यांनी सकाळी दहा वाजल्यापासून अमरण उपोषणाला सुरुवात केली.
बापू पठारे म्हणाले, "गेल्या अनेक दिवसांपासून या तीनशे मीटर रस्त्याचे काम प्रलंबित आहे. आम्ही जेव्हा जेव्हा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटतो तेव्हा तेव्हा ते अधिकारी बघू, करू, येऊ अशा प्रकारची उत्तर देतात. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला आंदोलन करावं लागलं. आजच्या आज या रस्त्याचं डांबरीकरण झालंच पाहिजे जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत मी अमर उपोषण करणार. वेळ पडली तर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना सुद्धा याबाबतची माहिती देणार आहे."
दरम्यान आंदोलनाच्या वेळी पुणे महापालिकेचे अधिकारी यांनी या रस्त्याला भेट देत काही प्रमाणावर रस्त्याच्या काम करायला सुरुवात केली होती. दुसरीकडे आंदोलन म्हटल्यावर पोलिसांचा बंदोबस्त ही तैनात करण्यात आला होता. एका बाजूला पुण्यातील वाढतं तापमान आणि वर दुपारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांना घेऊन पठारे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे पुणे महापालिकेचे आयुक्त किंवा संबंधित रस्ते विभागाचे अधिकारी हा अवघा तीनशे मीटर रस्ता दुष्ट करतात का पुन्हा एकदा आश्वासनाचा कागद देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.