Latest Political Updates in Marathi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोसह इतर विविध विकास कामांचे उद्घाटन होणार होते. मात्र पावसामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. पीएम मोदींचा दौरा रद्द झाल्यामुळे, या दौऱ्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यावरून आणि मेट्रो सुरू करण्यात यावी यासाठी काँग्रेस आणि मनसेकडून सरकारवर टीका करण्यात आली आहे. 'मेट्रो आज सुरू केली नाही तर, जेष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्या ११ वाजता मेट्रोचे उद्घाटन करणार.', असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
काँग्रेसच्या आमदारांनी नरेंद्र मोदी यांना २० प्रश्न विचारले आहेत. नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाल्यानंतरही काँग्रेसच्या तीन आमदारांनी पत्रकार परिषद घेतली. पुण्यातील काँग्रेस भवनात रवींद्र धंगेकर, संजय जगताप, संग्राम थोपटे यांचे एकत्रित पत्रकार परिषद घेतली आणि पीएम मोदी आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पीएम मोदींच्या दौऱ्यावर टीका करताना सांगितले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे करोडो रुपयांचा चुराडा झाला. कार्यालयात बसून जर उद्घाटन केले असते तर लाख रुपये वाचले असते.'
तसंच, 'निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उद्घाटन करणे हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पूरक नाही. राजकारण बाजूला ठेवून मेट्रोचे उद्घाटन करायला पाहिजे होतं. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मार्ग प्रवाशांसाठी सुरू करावा.', अशी मागणी रवींद्र धंगेकरांनी केली आहे. तर, काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी तर थेट सरकारला इशारा दिला आहे. 'मेट्रो आज सुरू केली नाही तर जेष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्या ११ वाजता मेट्रोचे उद्घाटन करणार. विरोध झाल्यास किंवा मागणी मान्य न केल्यास मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन आंदोलन करणार.', असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
तर, मेट्रोच्या मुद्द्यावरून मनसे देखील आक्रमक झाली असून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. 'स्वारगेट ते सिव्हील कोर्ट हा मार्ग राज्य सरकारने खुला करावा.' अशी मागणी मनसेने केली आहे. 'मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्याचा हट्ट का? पुणेकरांची ही क्रूर चेष्टा आहे, अशी टीका मनसेने केली आहे. 'पुणेकरांसाठी सुरू केलेला मार्ग, पुणेकरांना घेऊन सुरू करा.', मनसे चे सरचिटणीस हेमंत संभुस यांनी मागणी केली. 'राज्य सरकारच्या मंत्र्यांना उद्घाटनाचा कॉन्फिडन्स नाही का?', असा सवाल मनसेने केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.