केतन अग्रवालच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट
केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या बॉयफ्रेंडने केली हत्या
दोघांमध्ये ६ महिन्यांत २००० फोन कॉल आणि २३८ तासांहून अधिक संभाषण
पोलिस तपास सुरू आहे
लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून झालेल्या २५ वर्षीय केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. सुरुवातीला अपघात म्हणून समोर आलेल्या या घटनेमागे पूर्वनियोजित कट असल्याचा आता पोलिस तपासातून समोर आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सियाचं केतनसोबत लग्न ठरलेलं असताना देखील बॉयफ्रेंड चेतनसोबतचे काही चॅट्स आणि फोन कॉल्स समोर आले आहेत. सिया आणि चेतनमध्ये गेल्या ६ महिन्यात २३८ तास संवाद आणि २००० फोन कॉल झाल्याचे तपासात उघड झाले आहे. या चॅट्स आणि फोन कॉल्सच्या माहितीने या प्रकरणाला कोणती नवी दिशा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. सुरुवातीला हा अपघात असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, घटनेतील काही बाबी संशयास्पद वाटल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान तांत्रिक पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि सीसीटीव्ही फुटेजची छाननी करण्यात आली.
हातात आलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी केतनच्या मृत्यू प्रकरणाचा मागोवा घेतला आणि धक्कादायक बाब उघडकीस आली. या प्रकरणात केतनची होणारी बायको तसेच तिच्या बॉयफ्रेंडचा हात असल्याचे समोर आले आणि एकच खळबळ उडाली. सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने नियोजित कट रचून केतनला मारलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी सिया आणि केतन यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, १ जानेवारी ते १८ जून या कालावधीत सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात तब्बल २००० फोन कॉल झाले होते. या संभाषणांचा एकूण कालावधी २३८ तासांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. या आकडेवारीमुळे दोघांमधील जवळीक आणि त्यांच्या हालचालींबाबत तपास अधिक गतीने सुरू करण्यात आला. तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. केतनला यापूर्वीही अनेकदा लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले होते. १४ जून रोजी झालेल्या भेटीदरम्यानही त्याला कड्यावरून ढकलण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यावेळी साप दिसल्यामुळे धक्का लागल्याचा बहाणा करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेतन चौधरी हा संशयास्पद हालचाली करताना आणि चेहरा झाकून परिसरात वावरताना दिसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तसेच घटनेच्या दिवशीही सिया आणि चेतन यांच्यात संपर्क झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. दरम्यान, केतन आणि सिया यांचा विवाह येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार होता. कुटुंबीयांनी लग्नाची तयारीही सुरू केली होती. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.